यंदा १३ प्रवाशांचे आरपीएफने वाचविले प्राण, सर्वाधिक अपघात कल्याण स्थानकात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 01:29 AM2020-12-09T01:29:49+5:302020-12-09T01:30:31+5:30
Kalyan News : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानक कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत १३ लोकांचे प्राण वाचविले आहेत.
डोंबिवली : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानक कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत १३ लोकांचे प्राण वाचविले आहेत. २०१९ या वर्षात पुरुष आणि महिलांचे मिळून २१ जणांचे जीव वाचविले होते. यासाठी काही वेळा स्वत:चा जीव त्यांनी धोक्यात घातला होता. या अपघातांच्या बहुतांश घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, सह प्रवाशांच्या मोबाइलद्वारे समाज माध्यमांवर वेळोवेळी व्हायरल झाल्या आहेत.
या वर्षामध्ये, मुंबई उपनगरी मार्गावर अशा प्रकारे १३ पैकी ६ प्रवाशांचे प्राण कल्याण स्टेशनवर वाचले. त्यापैकी बहुतेक जण लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढत अथवा उतरत होते. गेल्या वर्षीच्या २१ घटनांमध्ये दादर स्थानकात ७ आणि भायखळा, कुर्ला, कल्याण आणि कर्जत स्थानकांवर प्रत्येकी २ जणांचे प्राण वाचविण्यात आले.
सतर्क असलेले आरपीएफ जवान निष्काळजीपणाने वागणाऱ्या, धावत्या गाड्यांमध्ये चढणाऱ्या लोकांचे प्राण वाचवतात. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे काही जण आत्महत्येचा प्रयत्न करताना आढळून आले आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात न घातला शांततेने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
जवानांचे काैतुक
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना गुन्हेगारी कारवाया, हिंसाचार, प्रवाशांच्या आंदोलनांमुळे रेल्वे गाड्या चालवण्यातील अडथळा, रेल्वे प्रवासात हरवलेल्या मुलांना शोधणे आणि गाड्या व रेल्वे परिसरातील अमली पदार्थ जप्त करणे अशा विविध आव्हानांना सामोरे जावे लागते.
प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही त्यांना बारीक नजर ठेवावी लागते. अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडतानाच ते रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशांचे जीव वाचविण्याचे कार्य करीत असल्याने रेल्वे प्रशासनाने त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
या वर्षामध्ये, मुंबई उपनगरी मार्गावर अशा प्रकारे १३ पैकी ६ प्रवाशांचे प्राण कल्याण स्टेशनवर वाचले.