मुंब्र्यात रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू
By अनिकेत घमंडी | Published: April 23, 2024 09:07 PM2024-04-23T21:07:18+5:302024-04-23T21:07:39+5:30
ते मुंबई येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करतात.
डोंबिवली: मुंब्रा येथील रेतीबंदर भागात उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. प्रसाद करीया मुलिया (३८) असे मृताचे नाव असून याप्रकरणाची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पातील रेतीबंदर रेल्वेपूलावरून प्रवासी खालील रस्त्यावर पडला. गर्दीमुळे हा अपघात झाला आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याचे पोलिसांनी सांगितले. असे असले तरी प्रवासी संघटनांकडून या अपघाताबाबत रेल्वे प्रशासनावर टीका करत आहे. ठाकूर्ली येथे प्रसाद मुलिया हे वास्तव्यास होते. ते मुंबई येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करतात.
सोमवारी त्यांची कंपनीमध्ये रात्र-पाळी होती. त्यामुळे ते रात्री मुंबईत कामानिमित्ताने जात होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रेल्वेगाडी येथील रेतीबंदर रेल्वे पूलावर आली. त्यावेळी ते रेल्वेगाडीतून थेट पूलाखालील रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. घटनेची माहिती मुंब्रा रेल्वे पोलीस आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ओळख पटावी यासाठी पथकाने त्यांच्या शर्टचे खिसे तपासले. त्यावेळी त्या तरुणाकडे मोबाईल व्यतिरिक्त काहीही आढळले नाही. पथकाने त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पंरतु दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.