१८ वर्ष पूर्ण केलेल्या युवकांनी १०० टक्के मतदान करावे : विठ्ठल कांबळे
By अनिकेत घमंडी | Published: March 7, 2024 03:51 PM2024-03-07T15:51:09+5:302024-03-07T15:51:25+5:30
छत्रपती शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान प्रसंगी केले आवाहन
डोंबिवली: शिक्षकांची राष्ट्र घडविण्यात असलेली महत्वाची भूमिका, संविधानातील हक्कांबरोबर कर्तव्यांची करून द्यावयाची आठवण, भारताची होत असलेली प्रगती, लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रत्येक १८ वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार यादीत आपली नोंद करून शंभर टक्के मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी कल्याणमध्ये राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावर बोलतांना केले.
छत्रपती शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान प्रसंगी कल्याणच्या नूतन विद्यालयाच्या पटांगणावर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व कल्याणकर नागरिकांच्या विशाल जनसमुहासमोर ते बुधवारी बोलत होते. ते पुढे म्हणाले राम मंदिर ही केवळ सुरवात आहे. संत महात्मे, महाराज, उद्योगपती, कलाकार, राजकारणी, समाजकारणी, असे सगळे लोक होते. ते स्वतःही पत्नी समवेत मंदिरात होते. सर्व समाजातील घटकांना पुढे घेवून जाणारा तो सोहळा होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सांगितलेल्या "बंधुता" या तत्वाकडे आपल्याकडून दुर्लक्ष होत आहे". त्यांच्या भाषणात त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. त्यात वर्तणुकीतून सामाजिक समरसता या विविध मुद्दय़ांवर आपले विचार मांडले. याच समारंभात कै. परशुराम स.मराठे स्मृती शिक्षक निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या शिक्षकांचा, परिक्षक प्रवीण देशमुख यांचा, तसेच आदर्श शिपाई, आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदर्श मुख्याध्यापक यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचा परिचय करून दिला. शिक्षकांच्या समुहाने, महाराष्ट्र गीत, हम करे राष्ट्र आराधन, व संपूर्ण वंदेमातरम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव डॉ. निलेश रेवगडे यांनी केले. उपाध्यक्ष प्रा. नारायण फडकेसर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य अशोक प्रधान, जनता सहकारी बँकेचे संचालक ॲड. सुरेश पटवर्धन, बाबा जोशी, रा.स्व.संघ पदाधिकारी व स्वयंसेवक, संस्थेची कार्यकारीणी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शेकडोंच्या संख्येत उपस्थित होते.