उल्हासनगर पालिकेचे झिरो कॅश काउंटर रुग्णालय; महापालिका रुग्णालय २० वर्षांसाठी ठेक्यावर?
By सदानंद नाईक | Published: September 22, 2023 03:35 PM2023-09-22T15:35:26+5:302023-09-22T15:36:40+5:30
गेल्या २ वर्षापासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले रुग्णालय एका संस्थेला झिरो कॅश काउंटरच्या नावाखाली तब्बल २० वर्षासाठी चालविण्यासाठी दिले आहे.
उल्हासनगर : महापालिकेने रुग्णालयाच्या उदघाटना पूर्वीच एका संस्थेला रुग्णालय २० वर्षांसाठी चालविण्यासाठी दिले आहे. आयुक्त अजीज शेख यांनी गुरवारी रुग्णालयाची पाहणी करून झिरो कॅश काउंटरची सुविधा शहरातील नागरिकांना उपलब्ध असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, आरोग्य सुविधेसाठी राज्य शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. मात्र कोरोना काळात महापालिका आयुक्त राजा दयानिधी व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या प्रयत्नातून रिजेन्सी-अंटेलिया येथे २०० खाटाचे रुग्णालय उभे केले. तसेच शासनाच्या निधीतून रुग्णाच्या सोयीसाठी ऑक्सिजन टॅंक बसवुन ११ कोटीचे साहित्य खरेदी केले. गेल्या २ वर्षापासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले रुग्णालय एका संस्थेला झिरो कॅश काउंटरच्या नावाखाली तब्बल २० वर्षासाठी चालविण्यासाठी दिले आहे.
दरम्यान, महापालिका रुग्णालयातील साहित्य रात्रीच्या वेळी टेम्पोत नेले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, एकच खळबळ उडाली. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी गुरवारी रुग्णालयाची पाहणी केली. तेंव्हा रुग्णालयाचे नूतनीकरण व रंगरंगोटीसाठी साहित्य इतरत्र गोदामात खाजगी संस्था पाठवीत असल्याची माहिती आयुक्तांनी देऊन साहित्याची यादी बनविल्याचे त्यांनी सांगितले. मात्र उपायुक्त सुभाष जाधव व वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांच्या प्रतिक्रियेत प्रचंड तफावत असल्याने, रुग्णालयातील साहित्या बाबत संभ्रम निर्माण झाला.
महापालिका रुग्णालयासाठी ११ कोटीचे साहित्य खरेदी केले होते. त्या साहित्याची विल्हेवाट परस्पर लावली तर जात नाही ना? अशी चर्चा शहरात रंगली होती. तसेच गेल्या दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णालय खाजगी संस्थेला चालविण्यासाठी दिले कसे? असे प्रश्न निर्माण झाले आहे. महापालिका रुग्णालय झिरो कॅश काउंटर या तत्वावर खाजगी संस्थेला देण्यात आल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
११ कोटीच्या साहित्याची खरेदी?
महापालिकेने कोरोना काळात उभे केलेल्या २०० बेडच्या रुग्णालयासाठी २०० ऐवजी ४०० बेडच्या रुग्णालय साठी ११ कोटीचे साहित्य खरेदी केले. एका उशीची किंमत-९००, गादी-१० हजार, बेड-१९ हजार ५००, चादर- बेडशीट-८००, उशी कव्हर-१८० रुपये अशी वाढीव किंमत होती. तत्कालीन स्थायी समिती सभापतीसह अन्य जणांनी टीका केली होती.