कल्याण परिमंडलात नवीन वीज जोडणीची ‘झिरो पेन्डन्सी; एकाच दिवसात १३६९ कनेक्शन

By अनिकेत घमंडी | Published: June 5, 2024 05:54 PM2024-06-05T17:54:05+5:302024-06-05T17:55:48+5:30

महावितरणचा आज वर्धापन दिन

zero pendency of new electricity connection in kalyan parimandal and 1369 connections in a single day | कल्याण परिमंडलात नवीन वीज जोडणीची ‘झिरो पेन्डन्सी; एकाच दिवसात १३६९ कनेक्शन

कल्याण परिमंडलात नवीन वीज जोडणीची ‘झिरो पेन्डन्सी; एकाच दिवसात १३६९ कनेक्शन

अनिकेत घमंडी, डोंबिवली: महावितरणचा वर्धापन दिन कल्याण परिमंडलात गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन असून त्यानिमित्त नवीन वीजजोडणीचा एकही अर्ज प्रलंबित न ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिले होते, त्यानुसार कल्याण परिमंडलात सर्व पात्र अर्जांवर कार्यवाही करून बुधवारी एकाच दिवसात तातडीने १३६९ नवीन वीजजोडण्या देत ‘झिरो पेन्डन्सी’चे लक्ष्य साध्य करण्यात  आल्याचा दावा महावितरणने केला.

कल्याण परिमंडलात एकूण १२३२ सिंगल फेज तर थ्री-फेजच्या १३७ वीज जोडण्या बुधवारी एकाच दिवशी कार्यान्वित करण्यात आल्या. यात कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत कल्याण पूर्व, पश्चिम व डोंबिवली विभागात सिंगल फेजच्या २७८ आणि थ्री फेजच्या ५७ वीजजोडण्या देण्यात आल्या. कल्याण मंडल कार्यालय दोनमधील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर भागात सिंगल फेजच्या ३३२ आणि थ्री फेजच्या ३५ वीजजोडण्या देण्यात आल्या. वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे परिसरात सिंगल फेजच्या सर्वाधिक ४१० आणि थ्री फेजच्या २४ वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या. तर पालघर मंडल कार्यालयातील पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड परिसरात सिंगल फेजच्या २१२ आणि थ्री फेजच्या २१ वीजजोडण्या देण्यात आल्या. या कामगिरीबद्दल मुख्य अभियंता औंढेकर यांनी अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

वर्धापन दिनानिमित्त कल्याण मंडल एक आणि मंडल दोन कार्यालयांचा एकत्रित कार्यक्रम डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात गुरुवारी सांयकाळी चार वाजता ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तर वसई आणि पालघर मंडल कार्यालयांच्या वतीने वसई व पालघरमध्ये स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

Web Title: zero pendency of new electricity connection in kalyan parimandal and 1369 connections in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.