आजरा नगरपंचायतीला सौरऊर्जेवरील प्रकल्पासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:05+5:302021-05-13T04:24:05+5:30
आजरा नगरपंचायतीने पुढील २५ वर्षांची विजेची गरज लक्षात घेऊन ६०० किलो वॅटचा सौरऊर्जेवरील प्रकल्प प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. ...
आजरा नगरपंचायतीने पुढील २५ वर्षांची विजेची गरज लक्षात घेऊन ६०० किलो वॅटचा सौरऊर्जेवरील प्रकल्प प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्याला पहिल्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये १७० किलो वॅटचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे.
गांधीनगर पंप हाउसजवळील गायरान जागेत हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची दोष दुरुस्ती नगरपंचायतीला करावी लागणार नाही. संपूर्ण प्रकल्पाला २५ वर्षांची हमी असल्याने संपूर्ण खर्च संबंधित कंपनी करणार आहे.
आजरा शहरातील स्ट्रेट लाइट, पाणी योजनेसाठी लागणारी वीज व नगरपंचायतीच्या इमारतीसाठी लागणारी वीज या सौरऊर्जेतून दिली जाणार आहे. नगरपंचायतीला यासाठी प्रत्येक वर्षी अंदाजे ६० लाख रुपयांचा खर्च येतो. या खर्चाची आता बचत होणार आहे.
शासनाचा ४ कोटी ५० लाखांचा ६०० किलो वॅटचा एकत्रित प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या तांत्रिक मंजुरीसाठी मेढाकडे प्रस्ताव पाठवला आहे. नगरपंचायत कार्यक्षेत्रात सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यासंदर्भातील आजरा शहरात राबविला जात असलेला राज्यातील हा पहिला प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आहे.
-----------------------
३८० मे. टन कोळशाचे ज्वलन व प्रदूषण थांबणार आजऱ्यासाठी प्रत्येक वर्षी लागणाऱ्या वीजनिर्मितीसाठी ३८० मे. टन कोळशाची गरज लागते. आता सौरऊर्जेवरील प्रकल्प होणार असल्याने लागणाऱ्या कोळशाचे ज्वलन व प्रदूषणही थांबणार आहे.
-------------------------
पावसाळ्यातही ३० टक्के वीजनिर्मिती
आजरा तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांत प्रचंड पाऊस असतो. त्यामुळे या कालावधीत फक्त ३० टक्के वीजनिर्मिती होणार आहे. मात्र, अन्य महिन्यांत तयार होणारी वीज गरजेपुरती घेऊन उर्वरित वीज वितरणाला दिली जाणार आहे.