जादा परताव्याच्या आमिषाने १ कोटी ४५ लाखांची फसवणूक; श्रीमंता बझार कंपनीकडून गंडा, संशयीतांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 09:04 PM2023-11-13T21:04:00+5:302023-11-13T21:08:54+5:30

संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

1 crore 45 lakh fraud with the lure of excess refund; Extortion by Srimanta Bazaar Company, Suspects in police custody | जादा परताव्याच्या आमिषाने १ कोटी ४५ लाखांची फसवणूक; श्रीमंता बझार कंपनीकडून गंडा, संशयीतांना पोलीस कोठडी

फोटो - संशयीत आरोपी सदाशिव चव्हाण व सुशांत चव्हाण

गारगोटी : गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने ३१ गुंतवणुकदारांची एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळगाव ता. भुदरगड येथील सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव दत्तात्रय चव्हाण, मुलगा सुशांत सदाशिव चव्हाण, अनिता सदाशिव चव्हाण, श्रीकांत रामाचार आचार्य उर्फ होलेहुन्नर (रा.पुणे) या चौघांविरुद्ध भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  अधिक माहिती अशी,पिंपळगाव येथील निवृत्त केंद्रप्रमुख प्राथमिक शिक्षक सदाशिव चव्हाण व त्याचा मुलगा सुशांत या दोघा बापलेकानी अनेकांना पैशाचा ७५ दिवसात आकर्षक परतावा देतो या आमिषाने "श्रीमंता बझार" या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले .गेले दिड वर्ष त्यानी पैसे परत देतो असे सांगत लोकांना आशेवर ठेवले पण आता ते टाळाटाळ करू लागल्याने लोकांनी पोलिसांत धाव घेतली.अवघडी आनंदा शालबिद्रे (रा.पिंपळगाव) यांनी भुदरगड पोलिसात फिर्याद दिली.

   श्रीमंता बझार कंपनीत माझे चांगले संबंध असून तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करा,गेली अनेक वर्ष मार्केटमध्ये ही कंपनी असून ही कंपनी प्रोडक्ट बेसवर काम करते.आतापर्यंत अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे.आपणही रक्कम गुंतवणूक करून फायदा मिळाला आहे. तुमचाही फायदा करून देतो ,येथून पुढेही चांगला परतावा मिळवून देण्याची जबाबदारी माझी तसेच अजून अनेक वर्षे कंपनी चालणार ,असे सांगत सर्वांचा विश्वास संपादन केला. या सेवानिवृत्त शिक्षकाविषयी समाजात चांगले स्थान असल्याने त्यांच्यावर सर्वांनी विश्वास ठेवला.ते सर्वांना जास्तीत जास्त रक्कमेची गुंतवणूक करण्यास सांगत होते.कंपनी चेक व अग्रीमेंट देते तसेच गडहिंग्लज येथे कंपनीचे विभागीय कार्यालय आहे असे सांगितले जात असल्याने व भागातील ओळखीचे शिक्षक असल्याने सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन मोठी गुंतवणूक केली.

 मे २०२१ पासून  सदाशिव चव्हाण यांनी लोकांना पैसे भरून घेत आकर्षक परतावा देण्यास सुरुवात केली .सुरुवातीला काहीजणांना  आपल्याजवळील स्वतः चे पैसे भरून परतावा मिळवून देत विश्वास संपादन केला व नंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. श्रीमंता बझार या कंपनीचे ऑक्टोबर २०२१ मध्ये गडहिंग्लज येथे कार्यालय सुरू करण्यात आले.त्यामुळे लोकांनी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत मोठया प्रमाणात पैसे गुंतवणूक केली.फिर्यादी शालबिद्रे यांच्यासह ३१ जणांकडून चव्हाण यांनी एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये भरून घेतले पण सांगितलेल्या मुदतीत पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर वारंवार विचारणा करूनही परतावा व मुळ रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने कंपनीकडून फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्याने पोलिसात धाव घेतली.अखेर भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला .

सेवानिवृत्त शिक्षक व त्यांचा मुलगा यांनी सुरुवातीला काही लोकांना पैसेही परत दिले व लोकांचा मोठा विश्वास संपादन केला. जानेवारी २०२२ मध्ये कंपनी अडचणीत असल्याचे  सेवानिवृत्त शिक्षक व मुलगा यांना माहीत असतानादेखील त्यांनी आपली व कमिशनरूपाने जमा झालेली मोठी रक्कम काढून घेण्यासाठी लोकांना आपल्याकडे रोखीने पैसे भरण्यास भाग पाडत तीन महिन्यांत कोट्यावधी रुपये जमा केले.जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात त्यांनी सर्वांकडून रोखीने पैसे भरून घेतले.ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा असलेल्या कमिशनरुपी वोलेटमधून लोकांना आयडी  ग्रीन करून देत कोट्यवधी रुपये मिळवले असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.चव्हाण यांच्या घरी पैसे मोजण्याची मशीन होती.ते लोकांच्याकडून रोख रक्कम पैसे मशीनवर मोजून घेत होते.मुलगा सुशांत हा लॅपटॉप वापरण्यात तज्ञ असल्याने अनेकांना या बाप-लेकानी अक्षरशः भुरळ घातली होती.

 

Web Title: 1 crore 45 lakh fraud with the lure of excess refund; Extortion by Srimanta Bazaar Company, Suspects in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.