Kolhapur: गजापूरवासीयांच्या नुकसानभरपाईसाठी १ कोटी ४९ लाख मंजूर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 03:17 PM2024-08-03T15:17:24+5:302024-08-03T15:17:34+5:30
कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणविरोधी आंदोलनावेळी मौजे गजापूरपैकी मुसलमानवाडी येथे झालेल्या हिंसाचारातील बाधित कुटुंबांना नुकसानभरपाईपोटी १ कोटी ४९ लाख ९० ...
कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणविरोधी आंदोलनावेळी मौजे गजापूरपैकी मुसलमानवाडी येथे झालेल्या हिंसाचारातील बाधित कुटुंबांना नुकसानभरपाईपोटी १ कोटी ४९ लाख ९० हजार ९०० रुपये मंजूर झाले आहेत. शुक्रवारी या निर्णयाचा शासन आदेश काढण्यात आला.
विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात १४ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान गजापूर येथे समाजकंटकांनी केलेल्या दगडफेक, जाळपोळ व हिंसाचारामुळे घरे, दुकाने, वाहने व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तातडीची मदत म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमधून ५६ बाधित कुटुंबांना प्रापंचिक साहित्य, सानुग्रह अनुदान व दैनंदिन मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये असे १४ लाख व ४२ घरांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयेप्रमाणे १० लाख ५० हजार असे एकूण २४ लाख ५० हजारांचे अनुदान देण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने हिंसाचारादिवशी केलेल्या तातडीच्या पंचनाम्यात नुकसानभरपाईची अंदाजित रक्कम अडीच कोटी धरली होती. मात्र, शाहूवाडी तहसीलदार यांच्याकडील सुधारित पंचनाम्यानुसार ही रक्कम १ कोटी ४९ लाख ९० हजार ९०० इतकी होते. ही रक्कम मिळावी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला होता.
यावर ३० जुलैला मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानभरपाईच्या रकमेला मंजुरी देण्यात आली. हा खर्च सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, दंगलग्रस्त भागातील झळ पोहोचलेल्या व्यक्तींना साहाय्य, सहायक अनुदाने या लेखाशीर्षाखाली उपलब्ध निधीतून किंवा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा, असे शासन आदेशात नमूद केले आहे.
अटी, शर्ती अशा
- नुकसानीबाबत नैसर्गिक आपत्तीसाठीचे निकष लावावेत.
- मदतीसाठी उत्पन्नाची अट नाही
- बाधित व्यक्तींचा या घटनेत गुन्हेगार म्हणून सहभाग नसावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल नसल्याची पोलिस विभागाकडून खातरजमा करावी.
- विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली असेल तर मदत मिळणार नाही.