अंबाबाईच्या खजिन्यात एक कोटींची भर, गेल्या चार दिवसांपासून सुरू होती मोजदाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 12:09 PM2023-03-03T12:09:43+5:302023-03-03T12:10:09+5:30
यापूर्वी दिवाळीनंतर दानपेट्या उघडण्यात आल्या होत्या
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात १ कोटी ७४ लाख २६ हजार इतक्या घसघसशीत देणगीची भर पडली. यापूर्वी दिवाळीनंतर दानपेट्या उघडण्यात आल्या होत्या.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या अंबाबाई मंदिरात समितीच्या १२ देणगी पेट्या आहेत. या पेट्या भरल्याने गेल्या चार दिवसांपासून गरुड मंडपाशेजारील मांडवात रकमेची मोजदाद सुरू होती.
ही मोजणी आता पूर्ण झाली असून सगळ्या दानपेट्यांमध्ये मिळून १ कोटी ७४ लाखांची भर पडली आहे. अंबाबाई मंदिराच्या माध्यमातूनच समितीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. या रकमेतूनच यासह अन्य देवस्थानांचे व्यवस्थापन केले जाते.
माऊली लॉजची मोजणी पूर्ण
अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंडाच्या संवर्धनात अडथळा ठरत असलेले माऊली लॉज देवस्थान समिती खरेदी करणार आहे. त्यानुसार गुरुवारी भूसंपादन विभागाने मोजणी केली आहे. विभागाकडून मिळकतीची रक्कम आली की वाटाघाटीतून मालकांना देय असणारी रक्कम ठरणार आहे.