आजऱ्यात वीज वितरणची दहा महिन्यांत १ कोटी ७८ लाखांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:47+5:302021-02-12T04:22:47+5:30
आजरा तालुक्यातील वीज वितरणची गेल्या दहा महिन्यांतील थकबाकी १ कोटी ७८ लाख इतकी आहे, तर आजपर्यंत एकूण थकबाकी १७ ...
आजरा तालुक्यातील वीज वितरणची गेल्या दहा महिन्यांतील थकबाकी १ कोटी ७८ लाख इतकी आहे, तर आजपर्यंत एकूण थकबाकी १७ कोटी रुपयांची आहे. थकबाकी भरण्यासाठी ग्राहकांशी संवाद साधून बिल भरण्याची विनंती केली आहे. अखेर आजपासून थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोना काळापासून विजेचे बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या ४२२२ असून, त्यांच्याकडे १ कोटी ७८ लाखांची थकबाकी आहे. घरगुती ग्राहक ३९७० असून, त्यांच्याकडे १ कोटी ४० लाख, व्यापारी ग्राहक १९४ असून, त्यांच्याकडे १८ लाख ५६ हजार, तर औद्योगिक ग्राहक ५८ असून, १९ लाख २७ हजारांची दहा महिन्यांतील थकबाकी आहे. वीज वितरणची एकूण थकबाकी १७ कोटींची आहे. त्यापैकी शेतीपंपाची ७ कोटी ८० लाख ग्रामपंचायत, पाणी पुरवठा १ कोटी ३७ लाख, पोल्ट्रीधारक ११ लाख ४३ हजार, पथदिवे ३ कोटी ५२ लाख, घरगुती २ कोटी २७ लाख, व्यापारी ५५ लाख १५ हजार, औद्योगिकचे १ कोटी १९ लाख अशी थकबाकी आहे.
थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी वीज वितरणचे वायरमन, अधिकारी व कर्मचारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. थकबाकीदार ग्राहकांना मोबाईलवरून बिल भरण्याची विनंतीही केली आहे. थकबाकीच्या बिलांचे समान हप्तेही ठरवून दिले आहेत. पण बिल भरण्याबाबत ग्राहकांमध्ये अद्यापही निरूत्साह आहे. काही ग्राहकांनी थकीत बिलापैकी २ ते ३ बिले भरली आहेत. पण उर्वरित बिले थकित दिसतात. आजपासून १ एप्रिलपासून थकित बिल असणाऱ्या ग्राहकांचा विद्युतपुरवठा बंद करण्यास सुरुवात झाली आहे. वीज बंद होणार म्हटल्यावर अनेक ग्राहकांनी थकित बिल भरण्यास सुरुवातही केली आहे.
--------------------
* कृषीपंपाची थकबाकी भरल्यास ५० टक्के सूट
कृषीपंपाची आजपर्यंतची थकबाकी २०२२ पर्यंत भरल्यास ५० टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. तीन वर्षांपैकी पहिल्यावर्षी ५० टक्के, दुसऱ्यावर्षी ३० टक्के, तर तिसऱ्यावर्षी २० टक्के अशी सवलत आहे. थकबाकीची जमा होणाऱ्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ज्या-त्या गावातील विकास कामांवर खर्च केली जाणार आहे.
---------------------------
* कटू प्रसंग टाळा : उपकार्यकारी अभियंता कमतगी
थकित वीज बिल भरल्यास सर्वच ग्राहकांना आजपर्यंत सवलत दिली आहे. प्रत्येक ग्राहकांशी संवाद साधून बिल भरण्याची विनंती केली आहे. यापुढे कटू प्रसंग टाळणे व विद्युतप्रवाह बंद होऊ नये यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरणा करावा, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी यांनी केले आहे.
---------------------------