मास्क-सॅनिटायझर व्यवसायाच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, कोल्हापुरात चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:37 PM2022-02-04T14:37:41+5:302022-02-04T14:57:25+5:30
ही रक्कम व्यवसायात न गुंतवता ती स्वत:च्या फायद्याकरीता वापरून फिर्यादी पवार यांच्यासह व्यावसायिक साथीदारांची आर्थिक फसवणूक केली.
कोल्हापूर : सॅनिटायझर, हँन्डग्लोज, पीपीई किट, ऑक्झीमीटर, फेस शिल्ड, मास्क या वस्तुंच्या ऑर्डर घेऊन त्या व्यवसायातून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाख १५ हजार ५०० रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चारजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
रोहीत हरिष नागदेव, राहूल हरिष नागदेव, हरिष बलोराम नागदेव (सर्व रा. महालक्ष्मी पार्क सोसायटी, हाॅकी स्टेडियमजवळ), व शाम पल्लोद अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद संतोष मोहन पोवार (वय ४०, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली, दौलतनगर) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व त्याचे व्यावसायिक सहकारी जिलानी मुल्ला, समीर भालदार असे तिघांचे शिरोली टोल नाक्याजवळ, कावळा नाका ते तावडे हाॅटेल रस्त्यावर डायमंड मोटर्स हे जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यात संशयितांची फिर्यादीसह व्यावसायिक साथीदारांची ओळख झाली.
या व्यवसायासोबत आपण सॅनिटाझर, हॅन्डग्लोज, पीपीई किट, ऑक्झीमीटर, फेसशिल्ड, मास्क या वस्तूंची ऑर्डर घेऊ व त्यातून मोठा नफाही मिळवू असे अमिष दाखवले.
त्यानूसार फिर्यादीसह त्याच्या साथीदारांनी वेळोवेळी या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यातून आतापर्यंत वेळोवेळी १ कोटी ५ लाख १५ हजार ५०० रूपये इतकी रक्कम फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी संशयितांना दिली.
ही रक्कम व्यवसायात न गुंतवता ती स्वत:च्या फायद्याकरीता वापरून फिर्यादी पवार यांच्यासह व्यावसायिक साथीदारांची आर्थिक फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.