‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार ३२ आयर्नमॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 02:03 PM2020-01-02T14:03:31+5:302020-01-02T14:09:27+5:30
कोल्हापूर : धावणे, सायकलिंग आणि जलतरण या क्रीडाप्रकारांचा संगम असणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे. ...
कोल्हापूर : धावणे, सायकलिंग आणि जलतरण या क्रीडाप्रकारांचा संगम असणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे. जगभरातील विविध स्पर्धांमध्ये यशाची पताका फडकविणारे ३२ आयर्नमॅन रविवारी (दि. ५ जानेवारी) होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन ते धावपटूंना प्रोत्साहित करणार आहेत.
या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या आयर्नमॅनची वर्षागणिक संख्या वाढत आहे. यावर्षी ३२ आयर्नमॅन सहभागी होणार आहेत. त्यांमध्ये आकाश कोरगावकर (झुरिच, स्वित्झर्लंड), वैभव बेळगावकर, पंकज रावळू, अक्षय चौगुले, अनुप परमाळे (मलेशिया), आदित्य शिंदे, रौनक पाटील, आशिष तंबाके, उदय पाटील, चेतन चव्हाण, डॉ. विजय कुलकर्णी, स्वप्निल माने, प्रदीपकुमार पाटील, महेश मेथे, विशाल कोठाळे, संदेश बागडी, विनोद चंदवानी (आॅस्ट्रिया), अमरपालसिंग कोहली (मलेशिया), नीतेश कुलकर्णी (आॅस्ट्रेलिया), अमर धामणे, अतुल पोवार, अविनाश सोनी, कुमार ब्रिजवानी, बाबासाहेब पुजारी, वीरेंद्र घाटगे, यश चव्हाण, वरुण कदम (आॅस्ट्रिया), मुकेश तोतला (स्पेन), बलराज पाटील, उत्तम फराकटे (झुरिच), साहिल चौहान (आॅस्ट्रेलिया) यांचा समावेश आहे. शारीरिक क्षमतेच्या कस लागणाऱ्या जगभरातील विविध स्पर्धांमध्ये बाजी मारत या धावपटूंनी ‘आयर्नमॅन सिटी’ अशी कोल्हापूरची नवी ओळख निर्माण केली आहे.
‘लोकमत’ने कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक, धावपटू आणि क्रीडाप्रेमींसाठी या महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक आरोग्यदायी, चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आम्ही धावपटू, नागरिकांना सुदृढ आरोग्याचा संदेश देणार असल्याचे या आयर्नमॅननी सांगितले.
सुप्रिया निंबाळकर यांचाही समावेश
कोल्हापुरातील सुप्रिया निंबाळकर यांनी कोलंबो येथे झालेल्या आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत त्या सेकंड फास्टेस्ट भारतीय खेळाडू ठरल्या आहेत. त्यांनी सहा तास १० मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करून नववा क्रमांक पटकाविला. त्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरल्या. सुप्रिया या गेली दोन वर्षे कोल्हापूर हाफ आयर्नमॅन स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत.
धावपटू तयारीत मग्न
सुदृढ आरोग्यासाठी ‘क्रॉस द लाईन’ अशी साद देणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा आता चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सहभागी धावपटू हे तयारीमध्ये मग्न आहेत. सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळेल त्यानुसार धावण्याचा सराव त्यांच्याकडून सुरू आहे. अधिकतरजण सामूहिकपणे सराव करीत आहेत.
बदलत्या जीवनशैलीमध्ये उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखायचे असल्यास चालणे, धावणे आणि इतर व्यायाम यांबरोबर योगासने, प्राणायाम यांना पर्याय नाही. औषधनिर्माणशास्त्रातील संशोधनाच्या जोरावर आपण बऱ्याच रोगांवर मात करू शकलो तरी, तितक्याच प्रमाणात मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि यासारख्या जीवनशैलीवर आधारित रोगांच्या विळख्यातही घट्ट अडकत चाललो आहोत. त्यातून जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर योग्य, सकस आहार आणि नियमित व्यायाम यांना पर्याय नाही. विद्यार्थी, युवकांमध्ये शालेय जीवनापासूनच तसे संस्कार व्हावेत, या दृष्टीने वारणा विविध उद्योग व शिक्षणसमूह सदैव विविध उपक्रम राबवीत असतो. वारणा विभाग शिक्षण मंडळ आणि तात्यासाहेब कोरे कॉलेज आॅफ फार्मसीकडून समाजाच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने विविध प्रबोधनात्मक उपक्रमही आम्ही सतत राबवीत असतो. ‘लोकमत’ समूहाने संपूर्ण महाराष्ट्रभर महामॅरेथॉन उपक्रम सुरू करून, संपूर्ण समाजाला आणि विशेषकरून तरुण-युवा पिढीला धावण्यातून आनंदी जगण्याची सुरुवात करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. मग चला तर कोल्हापूरकर, ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावूया, निरोगी राहूया!
- डॉ. जॉन डिसोझा,
प्राचार्य, तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज, वारणानगर
कोल्हापूर येथे रविवारी सकाळी होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये मी स्वत: सहभागी होणार आहे. सलग दोन वर्षे मी व माझ्या सहकाऱ्यांनी पाच किलोमीटर स्पर्धेत सहभाग घेतला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून धावपटू, क्रीडाप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने महामॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. ‘लोकमत’ने एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. आजच्या धावपळीच्या युगात तरुण पिढीने आपल्या चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे, असे मला वाटते.
-प्रदीप देशमुख,
संचालक, वारणा दूध संघ
सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या माध्यमातून सुमारे ५० वर्षांपूर्वी सहकार, क्रीडा, शिक्षण क्षेत्रांना चालना दिली. वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे विद्यार्थी, खेळाडू व नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. ‘लोकमत’च्या अनेक उपक्रमांमध्ये ‘वारणा समूहा’ने सहभाग घेतला आहे. वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित वारणा महाविद्यालय, कोरे इंजिनिअरिंग कॉलेज, आदी संस्थांतून आरोग्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले जातात. राज्य आणि केंद्र शासन, शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थी, खेळाडूंच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न वारणा शिक्षण समूहाने केला आहे. ‘लोकमत’ने रविवारी आयोजित केलेल्या महामॅरेथॉन उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.
- डॉ. एस. व्ही. आणेकर,
प्राचार्य, तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेज, वारणानगर.