कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ३० हजार नवमतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 06:15 PM2019-01-25T18:15:36+5:302019-01-25T18:16:25+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानातून एक लाख ३० हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिली.
कोल्हापूर : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानातून एक लाख ३० हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिली.
शाहू स्मारक भवन येथे नवव्या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त जिल्हा निवडणूक विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती ब्रॅड अॅम्बॅसडर व भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, महापालिका उपायुक्त मंगेश शिंदे, करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे, आदींची होती.
यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्ह्याच्या प्रारूप मतदार यादीनुसार २९ लाख ६५ हजार इतके मतदार होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०१९ ला १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नव मतदारांच्या मतदार नोंदणीची मोहीम जिल्ह्यात गतिमान करण्यात आली. यामधून ३१ जानेवारीला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत एक लाख ३० हजार नव्याने मतदारांचा समावेश होईल.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी काटकर म्हणाले, लोकशाही प्रक्रिया बलशाली करण्यासाठी मतदार जागृती महत्त्वाची असून, युवक-युवतींनी या कामी बहुमोल योगदान द्यावे. संयोगिता पाटील म्हणाल्या, १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी मतदानाची नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सक्रीय व्हावे. यापुढील काळात जिल्ह्यातील नवमतदारांशी महाविद्यालयांमध्ये जाऊन आपण संवादाद्वारे मतदार जागृतीचे काम करणार आहे.
स्नेहल भोसले म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महिला, युवक, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सेनादलातील मतदार, अनिवासी भारतीय, तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सचिन इथापे यांनी आभार मानले.
दरम्यान, मतदान जागृतीसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धांमधील दिव्यांग, तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा, तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाºयांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘मतदानासाठी सज्ज’
यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदार केंद्रावर नवमतदारांना ‘मतदार असल्याचा अभिमान-मतदानासाठी सज्ज’ हे घोषवाक्य लिहिलेल्या बॅचेस देण्यात आल्या. यावेळी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची चित्रफीत दाखविण्यात आली.