रस्त्यावर सापडलेले १ लाख रुपये केले परत; संजय वारुळकर यांच्या प्रामाणिकपणाचं परिसरात होतयं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 12:31 AM2023-07-11T00:31:14+5:302023-07-11T00:31:37+5:30
दरम्यान संजय वारुळकर यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.
सरुड - बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेवाडी (ता. शाहूवाडी ) या शाखेची रस्त्यावर सापडलेली १ लाख रु.ची रोकड वारणा कापशी येथील संजय नामदेव जाधव - वारूळकर यांनी प्रामाणिकपणे परत करत समाजात अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक आहे हे दाखवून दिले. दरम्यान संजय वारुळकर यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन कर्मचारी सोमवारी सकाळी १० वा. च्या सुमारास दुचाकी मोटार सायकल वरुन बँकेची रोकड बँकेच्या मालेवाडी शाखेत भरण्यासाठी जात होते. वडगाव ते वारणा कापशी मार्गावर जामदार गुरुजी यांच्या मठाजवळ बॅगेची चेन निघाल्याने त्यातील शंभर रु चे दहा बंडल रस्त्यावर पडले. ही गोष्ट त्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही. याचदरम्यान संजय वारुळकर हे बांबवडेकडे जात असताना त्यांना ही रोकड सापडली. रोकडवर असलेल्या सीलवरून ही रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची असल्याचे त्यांच्या लक्षात आले ही रोकड घेऊन ते त्याच ठिकाणी थांबले.
दरम्यान शिवारे येथे गेल्यानंतर बॅगेची चेन निघुन त्यातुन रोकड पडल्याचे संबधीत बँक कर्मचार्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पडलेली रोकड शोधण्यासाठी ते परत वडगावकडे निघाले. यावेळी त्यांनी वाटेत थांबलेल्या संजय वारुळकर यांच्याकडे चौकशी केली असता संबधीत वारुळकर यांनी ती रक्कम त्या बँक कर्मचाऱ्यांच्याकडे प्रामाणिकपणे सपुर्द केली.