कारागृहात प्रशांत कोरटकरवर १० कॅमेऱ्यांची नजर, धीरज चौधरीची तीन तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:46 IST2025-03-31T13:45:14+5:302025-03-31T13:46:30+5:30

चंद्रपूरला जाण्यासाठी धीरज चौधरीच्या कारचा वापर, कोरटकरची कार जप्त

10 cameras watch Prashant Koratkar in jail, Dheeraj Chaudhary questioned for three hours | कारागृहात प्रशांत कोरटकरवर १० कॅमेऱ्यांची नजर, धीरज चौधरीची तीन तास चौकशी

कारागृहात प्रशांत कोरटकरवर १० कॅमेऱ्यांची नजर, धीरज चौधरीची तीन तास चौकशी

कोल्हापूर : येथील जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन रद्द केल्यानंतर, नागपुुरातून चंद्रपूरला पळून जाण्यासाठी संशयित आरोपी प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा.नागपूर) याने प्रशिक पडवेकर (रा.नागपूर) याच्यामार्फत धीरज चौधरी (रा.चंद्रपूर) याची कार मागवून घेतली होती. कोरटकर याच्याशी काहीही संबंध नसल्याची माहिती चौधरी याने चौकशीत पोलिसांना दिली. दरम्यान, कोरटकर याची जप्त केलेली अलिशान कार पोलिसांनी रविवारी पहाटे कोल्हापुरात आणली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, संशयित कोरटकर पसार झाला होता. न्यायालयाने अंतरिम जामीन देऊन त्याला काहीसा दिला. त्यानंतर, अंतरिम जामीन रद्द झाल्याने अटक टाळण्यासाठी राज्याबाहेर पळून जाण्याचा कट त्याने रचला. त्यानुसार, प्रशिक पडवेकर या मित्रासोबत तो स्वत:च्या कारमधून चंद्रपूरच्या दिशेने निघाला होता. चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत गेल्यानंतर कोरटकरची कार बंद पडली. 

त्यावेळी पडवेकर याने त्याचा मित्र धीरज चौधरी याला फोन करून त्याची कार मागवून घेतली. चौधरीची कार घेऊन कोरटकर आणि पडवेकर चंद्रपूरला गेले. चौधरी यानेच कोरटकरची कार टोइंग करून नागपूरला दुरुस्तीसाठी पाठविल्याची माहिती चौधरीच्या चौकशीतून समोर आली. पोलिसांनी रविवारी सुमारे तीन तास चौधरी याची कसून चौकशी केली. गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवणार असल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.

चौधरीच्या जबाबाची पडताळणी होणार

चौधरी हा सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांचे ठेके घेतो. त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. त्याने दिलेल्या जबाबाची पोलिसांकडून पडताळणी होणार आहे. यासाठी चौधरी आणि पडवेकर या दोघांचे कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू आहे. पडवेकर यालाही चौकशीसाठी बोलविल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारागृहात कोरटकरवर १० कॅमेऱ्यांची नजर

कळंबा कारागृहात अंडासेलमध्ये रवानगी झालेला प्रशांत कोरटकर याच्यावर दहा कॅमेऱ्यांची नजर आहे. अंडासेलच्या आतील बाजूस ४, तर बाहेरच्या बाजूला ६ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, शिवाय सतत २ कर्मचाऱ्यांचीही त्याच्यावर नजर राहणार असल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली.

आलिशान कार जप्त

कोरटकरने पळून जाण्यासाठी वापरलेली त्याची आलिशान कार पोलिसांनी नागपुरातून जप्त केली. ती कार घेऊन पोलिस रविवारी पहाटे कोल्हापुरात पोहोचले. जप्तीचा पंचनामा करून कार सुरक्षित स्थळी ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 10 cameras watch Prashant Koratkar in jail, Dheeraj Chaudhary questioned for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.