केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडून १० कोटींचा निधी, राजेश क्षीरसागर यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 11:48 AM2024-08-09T11:48:58+5:302024-08-09T11:49:26+5:30
कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. या वास्तूत संगीत, नाट्यकलेची बीजेदेखील रूजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीनेकोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी आहे. पण या वास्तूच्या पुन:उभारणीसाठी तत्काळ १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
या संपूर्ण घटनेची माहिती क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविली. मुख्यमंत्री शिंदे यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली. यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, संपूर्ण नुकसानीची माहिती घेता अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाल्याचे दिसते. शासनाकडून १० कोटींची मदत तत्काळ मंजूर करण्यात आली आहे. अचानक लागलेल्या आगीने ऐतिहासिक वास्तू डोळ्यांसमोर जळणे ही गोष्ट दुर्दैवी आहे.
सरकार या वास्तूच्या पुनः उभारणीसाठी आवश्यक सर्व ती मदत करेल. यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांनी आपल्या आमदार, खासदार फंडातून निधी देऊन कोल्हापूरची अस्मिता पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.