शिरोळ तालुक्यातील ग्रामीण सुविधांसाठी १० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:44+5:302021-06-22T04:17:44+5:30
जयसिंगपूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २५, १५ योजनेअंतर्गत ...
जयसिंगपूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २५, १५ योजनेअंतर्गत रुपये १० कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केली असून लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे ही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
गावागावांमधील अंतर्गत रस्ते, गटारी, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह उभारणे, पाणीपुरवठा व पाणंद रस्ते मुरमीकरण, स्मशानभूमी विकसित करणे, विद्युतीकरण, खुली जागा विकसित करणे, पेव्हिंग्ज ब्लॉक, पथदिवे तसेच गावांमधील चौक सुशोभीकरण करणे यासारख्या कामांसाठी या निधीचा विनियोग करता येणार आहे. तालुक्याला मिळालेल्या या निधीमुळे ग्रामीण भागातील जनतेला ग्रामपंचायतींकडून मूलभूत सेवा पुरवणे शक्य होणार असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे राज्य सरकारपुढे प्रचंड आर्थिक अडचणी उभ्या असताना महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने सर्व प्रकारच्या विकासकामांना प्राधान्य देताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवला आहे. कोरोनामुळे आरोग्यावर होणारा प्रचंड खर्च, मागील दीड वर्षापासून राज्यातील उद्योग व्यवसायांसह अनेक घटकांना मोठा आर्थिक फटका बसल्याने त्याचे परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाले आहेत. असे असताना राज्य सरकार अशा आर्थिक अडचणींना तोंड देत असून विकासकामांना निधी देखील उपलब्ध करून देत आहे. या निधीमधून तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व गावांना मूलभूत विकासकामांसाठी निधी दिला जाणार असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
फोटो - २१०६२०२१-जेएवाय-०८-राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर.