शाहू समाधी स्मारक सुशोभिकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:28 AM2022-06-29T11:28:57+5:302022-06-29T11:29:48+5:30
शाहू महाराज यांनी आपली समाधी सिद्धार्थनगर, नर्सरी बाग येथे करावी, असे म्हटल्याची नोंद आहे. महाराजांची इच्छा आणि शाहुप्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून महानगरपालिकेने राजर्षी शाहू छत्रपती महाराज समाधी स्मारक स्थळ नर्सरी बागेत उभारले आहे.
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळाचे सुशोभिकरण व इतर कामे करण्याकरिता मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून ९ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ रुपयांच्या अंदाजपत्रकास शासनमान्यता मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
शाहू महाराज यांनी आपली समाधी सिद्धार्थनगर, नर्सरी बाग येथे करावी, असे म्हटल्याची नोंद आहे. महाराजांची इच्छा आणि शाहुप्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून महानगरपालिकेने राजर्षी शाहू छत्रपती महाराज समाधी स्मारक स्थळ नर्सरी बागेत उभारले आहे. यातील पहिला टप्पा पूर्ण केला असून आता दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आवश्यक निधीस मान्यता मिळाल्यामुळे या टप्प्यात होणारे काम अत्यंत जलदगतीने पूर्ण होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
छत्रपती शाहू महाराजांचा शंभरावा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व समारंभ १८ एप्रिल २०२२ ते २२ मे २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला. या पर्वासाठी महाविकास आघाडी सरकारकडून ५ कोटी रुपयांचा निधी देखील कोल्हापूर जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. महाविकास आघाडी सरकार जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. हा निधी मिळवून दिल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम व खासदार संजय मंडलिक यांचे पालकमंत्री पाटील यांनी आभार मानले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात होणारी कामे...
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल नूतनीकरण
- या हॉलमध्ये आर्ट गॅलरी, डॉक्युमेंटरी दाखविण्याची सोय
- दलितमित्र दादासाहेब शिर्के उद्यान कंपाैंड वॉल, लॅन्डस्केपिंग
- पार्किंग सुविधा, तसेच टॉयलेट्स बांधणी
- परिसरातील सात समाधींचे दुरुस्तीसह नूतनीकरण