ताराराणी महोत्सवात दहा लाखांवर उलाढाल
By admin | Published: February 15, 2016 01:07 AM2016-02-15T01:07:20+5:302016-02-15T01:12:08+5:30
खाद्यांवर मारला ताव : रविवारच्या सुटीमुळे खरेदीसाठी प्रचंड झुंबड
कोल्हापूर : रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे ताराराणी महोत्वात विविध वस्तू खरेदीसाठी आणि पाहण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत गर्दी राहिली. विशेषत: नोकरदार मंडळी कुटुंबासह गर्दी खरेदी करताना दिसत होते.
गरमागरम खाद्यांवर ताव मारण्याकडे खवय्यांचा कल अधिक राहिला. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात सुरू असलेल्या महोत्सवात दोन दिवसांत दहा लाखांवर उलाढाल झाली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे जिल्हास्तरीय ‘ताराराणी महोत्सव २०१६’ शुक्रवार (दि. १२)पासून सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांतून आणि कोकणातून महिला बचत गटांनी महोत्सवात सहभागी झाले आहेत. बचत गटांतर्फे तयार केलेल्या वस्तूंचे, उत्पादनांचे स्टॉल्स आहेत. सकाळी ११ पासून रात्री उशिरापर्यंत खाण्याच्या स्टॉल्सवर गर्दी होती. दहा रुपयांतही खाण्याचे ताजे पदार्थ मिळत असल्यामुळे ग्राहक खाद्य स्टॉल्सजवळ रेंगाळत होते. बेळगावची प्रसिद्ध मसूर, नाचणी, चिवडा, जयसिंगपूरचे भडंगही आहे. सहेली महिला बचत गटांनी तयार केलेले विळे, खुरपे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. बाजारपेठेपेक्षा कमी किमतीत विविध आकाराचे विळे शेतकरी खरेदी करताना दिसत होते. (प्रतिनिधी)
पुरणपोळीचे कुतूहल..
नाशिकचे प्रसिद्ध मांडे (पुरणपोळी) कसे बनवले जाते, याबद्दल अनेकांत कुतूहल जाणवले. साठी ओलांडलेल्या एक आजीबाई अतिशय कौशल्याने पुरणपोळी न लाटता हातावर फिरवून करत होत्या. पुरणपोळी पहिल्यापासून शेवटपर्यंत कशी तयार होते, ते अनेक महिला थांबून बारकाईने निरीक्षण करत होत्या.