महिलांना १ रुपयांत दहा सॅनिटरी नॅपकिन देणार, मासिक पाळी स्वच्छता दिनी ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 05:17 PM2022-05-28T17:17:16+5:302022-05-28T18:31:13+5:30
राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार असून ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी राज्य शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील तसेच बचत गटाच्या महिलांसाठी १ रुपयांत दहा सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार असून ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, शनिवारी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेते मंत्री मुश्रीफ यांनी ही घोषणा केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांसाठी मासिक पाळी हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील दारिद्र रेषेखालील महिलांसाठी एक रुपयांमध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी २०० कोटी खर्च अपेक्षित असून त्याची तरतुद करण्यात आली आहे.
१२ टक्केच महिलांकडून सॅनिटरी नॅपकीनचा वापर
भारतात तीनशे वीस दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या महिला महिलांपैकी केवळ १२ टक्केच सॅनिटरी नॅपकिन वापरतात. यामुळे चार वर्षे भारतात ६० हजारांहून अधिक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारा मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळी बद्दलच्या समजूतीमध्ये निष्काळजीपणामुळे होतो. राज्यात केवळ ६६ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात.
१९ वर्षाखालील युवतींना सहा नॅपकिन्स कीट
आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त १९ वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. सध्या ही योजना सुरु आहे.