माथेरान नगरपरिषदेचे शिवसेनेचे १० नगरसेवक भाजपमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 03:19 PM2021-05-27T15:19:57+5:302021-05-27T15:22:02+5:30
Bjp ChandrkantPatil : रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगराध्यक्ष जरी शिवसेनेचा असला तरी त्यांनी बहुमत गमावले आहे. यावेळी माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकुर उपस्थित होते.
कोल्हापूर : रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगराध्यक्ष जरी शिवसेनेचा असला तरी त्यांनी बहुमत गमावले आहे. यावेळी माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकुर उपस्थित होते.
या नगरपरिषदेमध्ये १७ पैकी १४ नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. त्यातील दहा सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी यांचे पाटील यांनी भाजपचा स्कार्फ घालून, गुलाबपुष्प देवून स्वागत केले. या सर्वांचा भाजपमध्ये सन्मान केला जाईल असे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, माजी मंत्री, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नियोजनाप्रमाणे कोकणात भाजपची घोडदौड सुरू आहे.
आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक काम करण्याची पद्धत, लोकांना मिळणारा सन्मान लक्षात घेवून या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माथेरान येथे पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम घेतला जाईल. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया चौधरी, समित्यांचे सभापती व नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, सोनम दाभेकर, प्रतिभा घावरे, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे , चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.