कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टल मताचा टक्का वाढला, मतदारसंघनिहाय झालेले मतदान..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:22 PM2024-11-13T16:22:47+5:302024-11-13T16:24:51+5:30
लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पोस्टल मतांमुळेच पराभव झाला होता.
कोल्हापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतके बंडखोर रिंगणात उतरल्याने राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचंड घासाघीस सुरू आहे. एकेका मतासाठी उमेदवार मतदारांचे उंबरे झिजवत असून, या निवडणुकीत पोस्टल मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदा पोस्टल मतदानाची आकडेवारीही कमालीची वाढली आहे. त्यामुळे हे मतदान कुणाच्या पारड्यात पडणार यावर गुलाल ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहा मतदारसंघांत मिळून १० हजार १०० मतदान पोस्टल आहे.
निवडणूक कामात सहभाग घेतलेल्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा असून ९ व १० नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्यात हे पोस्टल मतदान झाले. तब्बल ९ हजार ६८९ जणांनी पोस्टल मतदान केले आहे. पोस्टल मतदानाचा हा टक्का सर्वाधिक आहे. निवडणूक अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आल्याने बहुतांश उमेदवारांनीही आपले मतदार असलेल्या बाहेरच्या जिल्ह्यांतील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची विनंती केली होती. त्यामुळे यंदा रांगा लावून पोस्टल मतदान झाले आहे.
अटीतटीमुळे घेतला बोध
पूर्वी पोस्टल मतदान हे एकून मतदानाच्या तुलनेत अत्यंत कमी असायचे. त्यामुळे या मताचे मोल उमेदवारांना वाटत नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निवडणुका अटीतटीच्या होऊ लागल्याने ही मते गुलाल लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावू लागली आहेत. त्यामुळे या मतांचे महत्त्व उमेदवारांना जाणवू लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पोस्टल मतांमुळेच पराभव झाला. ‘काँटे की टक्कर’ झालेल्या या निवडणुकीत पोस्टल मतांमध्ये रवींद्र वायकर यांनी बाजी मारली. शिवाय, बीड लोकसभा मतदारसंघातही पोस्टल मतांची फेरमोजणी करण्याची वेळ आली. त्यामुळे ही मते किती निर्णायक ठरू शकतात, याचा प्रत्यय आला.
विधानसभा मतदारसंघनिहाय पोस्टल झालेले मतदान
चंदगड- ११४०, राधानगरी- ११०९, कागल- ९६६, कोल्हापूर दक्षिण- ११४५, करवीर- १०६५, कोल्हापूर उत्तर- ८४९, शाहूवाडी- ९०८, हातकणंगले- ९०२, इचलकरंजी- ९५३, शिरोळ- ७५२.