मनपाचे १० हजार विद्यार्थी सुटा-बुटात
By admin | Published: June 18, 2015 12:32 AM2015-06-18T00:32:57+5:302015-06-18T00:36:06+5:30
प्राथमिक शिक्षण मंडळाचा उपक्रम : लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना बूट, टायसह मोफत प्रवासाची सुविधा
भारत चव्हाण - कोल्हापूर -महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी. या शाळांना गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून प्राथमिक शिक्षण मंडळ दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत आहेत. यंदा त्याचाच एक भाग म्हणून मनपा शाळेतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय बूट, सॉक्स व टाय अशी भेट दिली जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना ‘घर ते शाळा’ अशा प्रवासासाठी केएमटीचा मोफत पास मिळणार आहे.
दहा हजार विद्यार्थ्यांना बूट, सॉक्स व टाय देण्यासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाने देणगीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. एक चांगला उपक्रम असल्याने शहरातील अनेक दानशुरांनी या उपक्रमास सहकार्य करण्यात पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे अगदी सुरवातीच्या टप्प्यात अडीच हजार विद्यार्थ्यांची जबाबदार टिंबर मार्केट येथील व्यापाऱ्यांनी उचलली.
मंडळाच्या सदस्यांनी या उपक्रमाची माहिती जेव्हा व्हॉटस् अॅपच्या विविध ग्रुपवर टाकली तेव्हा समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही जण मंडळाशी संपर्क साधून आमच्याकडून निधी घेऊन जावा, असा निरोप देत आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळ सदस्य व पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. निधीचे संकलन आणि त्याचे योग्य नियोजन व वाटप करण्याची यंत्रणा मंडळाच्या सदस्यांनी उभारण्यास सुरुवात केली असून एकत्रितपणे बूट, सॉक्स व टाय खरेदी के ले जाणार आहेत.
मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या शालेय पुस्तके, वह्णा, गणवेश भेट दिले जातात. यंदाच्या वर्षापासून बूट, सॉक्स व टायची भेट मिळणार असल्याने विद्यार्थी, शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे. ही नवीन भेट आॅगस्ट महिन्यात दिली जाण्याची शक्यता आहे.
सात शाळा इमारती
‘पीपीपी’वर देणार
चार वर्षांपूर्वी पुरेसे विद्यार्थी मिळत नसल्याने सात शाळा बंद करून त्यामधील विद्यार्थी नजीकच्या शाळेत वर्ग केले, परंतु ज्या शाळा बंद केल्या त्याच्या इमारती तशाच पडून आहेत. या शाळा इमारती म्हणजे मोकाट जनावरे, मद्यपींचे आश्रयस्थान बनले आहे. त्या भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयोग एकदा फसला. पुन्हा निविदा काढण्यात आल्या परंतु त्याचे भाडे जास्त होत असल्याने निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे धोरणात बदल करून पुन्हा एकदा त्या भाड्याने देण्याचा प्रयत्न पालिकेने चालविला आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महासभेपुढे येणार आहे.
विद्यार्थी पटसंख्येत वाढ
शिक्षण मंडळ सदस्य, शिक्षक,अधिकारी यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचे यंदा दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत ही पटसंख्या ६०० ने वाढली आहे. शिक्षकांनी मार्च व मे महिन्यात एक मोहीम राबवून विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत घालण्याचे आवाहन पालकांना केले होते. शहरातील २५ शाळांत ही पटसंख्या वाढली आहे.
चार शाळांत प्रवेश फुल्ल
एकीकडे काही शाळांत विद्यार्थी पटसंख्या कमी असली सुमारे २५ शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळाले आहेत. लोणार वसाहत व विक्रमनगर येथील शाळेतही पटसंख्या मोठी आहे. जरगनगर येथील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर, लक्षतीर्थ येथील अण्णासो शिंदे विद्यामंदिर तर फुलेवाडी व राजोपाध्ये येथील शाळांतून विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्याने ‘प्रवेश संपले’ची पाटी लावावी लागली.
के.एम.टी.चा मोफत प्रवास
मनपाच्या शाळेकडे विद्यार्थी, पालकांनी आकृ ष्ट व्हावे या हेतूने सर्व विद्यार्थ्यांना के.एम.टी. बसमधून ‘घर ते शाळा व परत’ असा प्रवास मोफत मिळणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय महासभेत नुकताच घेण्यात आला होता. आजच, बुधवारी त्यासंबंधीचे अधिकृत पत्र शिक्षण मंडळाला मिळाले. आता हा निरोप सर्व शाळा मुख्याध्यापकांना देण्यात येणार आहे. शाळांनी एकत्रित अर्ज के.एम.टी.कडे सादर करायचे असून, के.एम.टी. मोफत प्रवासाचा छायाचित्र व मार्ग नोंद असलेला पास वितरीत करणार आहे. विशेषत: उपनगरांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.