१० हजार लसीची मागणी, उपलब्ध दीड हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:25 AM2021-05-08T04:25:01+5:302021-05-08T04:25:01+5:30
कोपार्डे : करवीर तालुक्यात आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणासाठी दहा हजार लसींची मागणी केली जात आहे पण प्रत्यक्षात दीड ते ...
कोपार्डे : करवीर तालुक्यात आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणासाठी दहा हजार लसींची मागणी केली जात आहे पण प्रत्यक्षात दीड ते दोन हजार लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम अडखळत सुरू ठेवण्याची कसरत आरोग्य विभागाला करावी लागत आहे.
करवीर तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरुवात झाली एप्रिलच्या मध्यापर्यंत ती संथ गतीने होती. पण शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट निर्माण झाल्याने दररोज शेकडो लोक कोरोनाबाधित होत आहेत. करवीर तालुक्यातील गावागावात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
दररोज शंभर बाधितांची संख्या गुरुवारी २११ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या दर दिवशी सहा ते सात आहे. दुसऱ्या लाटेत करवीर तालुक्यात २ हजार ६४९ वर पोहोचली आहे. या कोरोना बाधितांना योग्य उपचार मिळण्यासाठी यातायात करावी लागत आहेत. तालुक्यात शिंगणापूर, केआयटी ही दोनच कोविड केंद्र आहेत; पण येथे केवळ दोनशे रुग्णांची सोय होऊ शकते.
करवीर तालुक्यात १८ ते ४४ वयोगटांतील ३ लाख ५० हजार तर ४५ वयोगटांवरील १ लाख ६० हजार जनता कोरोना लसीकरणासाठी लाभार्थी आहेत पण लसीचा मोठा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम अडखळत सुरू आहे. दररोज १० हजार लसीची मागणी होते पण पुण्याहून करवीर तालुक्यासाठी केवळ दीड दोन हजारच डोस येत असल्याने लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा दिसत आहेत. येथून ही कोरोनाचा समूह संसर्ग होण्याची दाट शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
प्रतिक्रिया
कोरोना लसीकरणासाठी मिळणारी लस कमी प्रमाणात मिळत असल्याने लोकांना रांगेत तिष्ठत बसावे लागत आहे. त्याचा राग आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर व्यक्त करून वादावादीचे प्रकार पण घडत आहेत तरीही कर्मचारी संयमाने ही मोहीम नेटाने राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. -
जी. डी. नलवडे, तालुका आरोग्य अधिकारी
(फोटो)
खाटांगळे (ता. करवीर) येथे कोरोना लसीकरणासाठी भली मोठी रांग होती. त्यात वयोवृद्धांची संख्या मोठी दिसत होती