अंबाबाईला हैदराबादमधील भाविकाकडून १० तोळ्यांचा कमरपट्टा, १५९० हिरे, १३ मौल्यवान खडे अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:19 AM2022-04-21T11:19:13+5:302022-04-21T11:43:48+5:30
प्रवीण अर्कला हे प्रसिद्ध उद्योगपती असून त्यांनी आपल्या मुलीसाठी अंबाबाईकडे नवस मागितला होता.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला हैदराबादमधील उद्योगपती प्रवीण अर्कला यांनी मंगळवारी १ हजार ५९० नैसर्गिक हिरे, १३ मौल्यवान रंगीत खडे असलेला १०१.९५ ग्रॅमचा सोन्याचा कमरपट्टा आणि पांढरे खडे असलेली १५ हजारांची सोन्याची नथ अर्पण केली. कमरपट्ट्याची किंमत ८ लाख ७५ हजार रुपये असून बुधवारी अंबाबाईच्या सालंकृत पूजेत तो देवीला घालण्यात आला.
प्रवीण अर्कला हे प्रसिद्ध उद्योगपती असून त्यांनी आपल्या मुलीसाठी अंबाबाईकडे नवस मागितला होता. तो पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुलीसाठी २५ लाखांचा कमरपट्टा तयार करून घेतला आहे. पण त्याआधी अंबाबाईचा नवस फेडण्यासाठी ते सहकुटुंब कोल्हापुरात आले. मंगळवारी त्यांनी अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्याकडे हा कमरपट्टा आणि सोन्याची नथ अर्पण केली. बुधवारच्या देवीच्या सालंकृत पूजेत हा कमरपट्टा वापरण्यात आला.