कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून ५०० च्या मुद्रांक, बहिणींच्या अनुदानाचा भार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:11 PM2024-10-16T17:11:08+5:302024-10-16T17:20:50+5:30

सर्वसामान्यांना मात्र आर्थिक फटका

100, 200 stamps off All transactions will now have to be done in Rs 500 denomination | कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून ५०० च्या मुद्रांक, बहिणींच्या अनुदानाचा भार 

कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून ५०० च्या मुद्रांक, बहिणींच्या अनुदानाचा भार 

कोल्हापूर : लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाऊस पाडल्याने १००, २०० रूपयांंचे मुद्रांक बंद करून सर्व व्यवहार आता ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावे लागणार आहेत. महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी आज बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला.

सर्वसाधारण व्यवहारासाठी जसे की, प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, संचकार पत्र, विक्री करार अशा एक ना अनेक कामांसाठी सरसकट १०० रुपयांच्या मुद्रांकांचा वापर केला जात होता. परंतु त्याच कामांसाठी आता लोकांना जादा ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रासाठी आतापर्यंत २०० रुपयांचा मुद्रांक वापरला जात होता, त्यासाठीही आता ५०० रुपये लागणार आहेत.

पूर्वी केलेल्या करारपत्राचा आता अंतिम विक्री दस्त करायचा झाल्यास त्यांनाही वाढीव मुद्रांक भरावा लागेल. मुद्रांक शुल्क बसविण्यात सुलभता व एकरूपता आणण्याच्या आणि शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने ही सुधारणा करण्यात आल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे. विविध लोकानुययी योजनांचा कोट्यवधींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. परिणामी इतर योजनांसाठी, विकासकामांसाठी निधींची कमतरता पडत असल्याने सरकार उत्पन्न वाढीसाठी असे विविध निर्णय घेत आहे.

  • दृष्टिक्षेपात मुद्रांक विक्रेते
  • राज्यभरात विक्रेते : ५५००
  • विक्रेत्यांना मिळणारे कमिशन : १०० रुपयांस ३ रुपये.
  • कोल्हापूर जिल्हयातील विक्रेते : १०० हून अधिक


जिल्हाधिकाऱ्यांची आज भेट

सर्वसामान्यांना कोणतेही प्रतिज्ञापत्र करण्यासाठी १०० रुपयांचा मुद्रांकच परवडणारा आहे. त्यासाठी त्याला ५०० रुपये मोजावे लागू नयेत. त्यामुळे ही ५ पट वाढ कमी करावी अशी मागणी कोल्हापुरातील मुद्रांक विक्रेते आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून करणार आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य लोकांना आर्थिक झळ बसणार आहे. शासनाने आम्हाला १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करणार नाही, असे २०२३ ला लेखी दिले असतानाही आता असा निर्णय घेतला असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दरवाढीस आमचा विरोधच आहे. - शंकर भिसे अध्यक्ष, मुद्रांक विक्रेता दस्त लेखनिक संघ महाराष्ट्र राज्य

Web Title: 100, 200 stamps off All transactions will now have to be done in Rs 500 denomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.