विजयादशमीपूर्वी अंबाबाई विकास आराखड्याचे १०० कोटी येतील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:16 PM2023-10-17T12:16:43+5:302023-10-17T12:17:21+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १०० कोटी विजयादशमीपूर्वी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १०० कोटी विजयादशमीपूर्वी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली. कोल्हापूरच्या विमानतळ भूसंपादन मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि आंबेओहळ प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील बदलाबाबत सोमवारी बैठक झाली. मंदिर परिसरातील विकास आराखडाअंतर्गत सरस्वती चित्रपटगृहाजवळील बहुमजली वाहनतळ इमारतीच्या नवीन बदलाबात प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सादरीकरण केले. यासाठी डिएसआर बदलल्यामुळे ७९.९६ कोटी रुपयांचा आराखडा १०० कोटींवर जाईल यावर बैठकीत चर्चा झाली. यावर गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवरात्रात हे पैसे मिळावेत अशी मागणी केल्याचे सांगून मुश्रीफ यांनी या विजयादशमीपर्यंत तो निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
या बैठकीला आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, महावितरणचे अधिकाऱ्यांसह विकास आराखडा समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
विमानतळ भूसंपादनाच्या प्रक्रियेत ज्यांनी जमीन संपादनाला मुदतीत प्रतिसाद दिला नाही, त्यांनी मुदतवाढ मागितली आहे, त्यांना दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली होती, ती नोव्हेंबर अखेर वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला जाणार आहे. आंबेओहळाच्या प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून ३६ हेक्टर जमीन वाटप करण्याची राहिली आहे. या प्रकल्पाचे १०० टक्के पुनर्वसन पूर्ण होण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांत हरीश धार्मिक, गडहिंग्लज प्रांत बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते.