ऊस ‘रोपवाटिका’द्वारे १०० कुटुंबे झाली स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:02 PM2018-11-28T12:02:17+5:302018-11-28T12:02:41+5:30

यशकथा : शेतकऱ्यांना ऊस रोपवाटिका काढण्यासाठी प्रोत्साहन व मदत केल्याने हे शेतकरी आता स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत.

With 100 percent of the families of sugarcane growers, self-sufficient | ऊस ‘रोपवाटिका’द्वारे १०० कुटुंबे झाली स्वयंपूर्ण

ऊस ‘रोपवाटिका’द्वारे १०० कुटुंबे झाली स्वयंपूर्ण

googlenewsNext

- घनश्याम कुंभार (यड्राव, जि. कोल्हापूर )

शिरदवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी लक्ष्मण कुंभार यांनी ऊस रोपवाटिकेच्या माध्यमातून परिसरातील शंभरहून अधिक कुटुंबे स्वयंपूर्ण बनविली आहेत. या शेतकऱ्यांना ऊस रोपवाटिका काढण्यासाठी प्रोत्साहन व मदत केल्याने हे शेतकरी आता स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. त्यांच्या रोपांना कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यांतून मोठी मागणी आहे.  त्यांच्याकडील अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाने कृषी सहायकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कुंभार यांच्यावर सोपविली आहे. कृषी सहायकांबरोबरच ते परिसरातील शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. 

कुंभार यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. शिक्षण कमी असले तरी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची धडपड त्यांच्या अंगी होती. पारंपरिक पद्धतीने उसाच्या बियाणांची लागण न करता त्यासाठी रोपे तयार केली, तर कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. या हेतूने त्यांनी उसाच्या रोपवाटिका तयार करण्याचा निर्णय घेतला. अंगात कष्टाची तयारी आणि मनातील जिद्दीमुळे त्यांनी २००७ मध्ये प्लास्टिक पिशवीत उसाची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. या रोपांची विक्री चांगल्या प्रकारे झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. पुढील वर्षी त्यांनी प्लास्टिक पिशवीऐवजी ट्रेचा वापर केला. कोकोपीठ घालून त्यांनी ट्रेमध्ये रोपांची वाढ केली आणि जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी ठरला. 

स्वत:ची अद्ययावत रोपवाटिका तयार झाल्यानंतर इतर शेतकऱ्यांनाही त्याचे अनुकरण करून उत्पादन क्षमता वाढवविण्यासाठी कुंभार यांनी प्रयत्न केले. त्यांनी शेतकरी व आपल्या नातेवाईकांना अशा प्रकारची ऊस रोपवाटिका तयार करण्यास प्रोत्साहित केले. त्यासाठी स्वत: तिथे जाऊन मार्गदर्शन केले, बियाणे,  प्लास्टिक ट्रे, कोकोपीठ उपलब्ध करून देऊन रोपवाटिका तयार करून दिली. 
रोपवाटिका केली; पण रोपांच्या विक्रीची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता; पण कुंभार यांनी रोपांच्या विक्रीची जबाबदारीही स्वीकारल्याने या शेतकऱ्यांनी झोकून देऊन काम केले. १०० हून अधिक शेतकऱ्यांनी रोपवाटिका सुरू केल्याने त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली. सोलापूर, बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून कुंभार यांनी तयार केलेल्या ऊसरोपांना चांगली मागणी आहे. त्याशिवाय सांगली, नांदेड, रत्नागिरी येथील शेतकरीही रोपांच्या खरेदीसाठी येतात. 

कुंभार यांच्या कष्टांना सरकारदरबारीही न्याय मिळाला आहे. कृषी विभागाने त्यांच्यावर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील कृषी सहायकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविली आहे. शिरदवाड येथील कुंभार यांच्या शेतातच हे प्रशिक्षण देण्यात येते. कृषी सहायकांबरोबरच शेतकऱ्यांनाही ते मोफत सल्ला व मार्गदर्शन देत असतात. 

Web Title: With 100 percent of the families of sugarcane growers, self-sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.