अकरा कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी

By admin | Published: May 4, 2016 12:14 AM2016-05-04T00:14:27+5:302016-05-04T00:14:27+5:30

कोल्हापुरात आढावा बैठक : उर्वरित एफआरपी तत्काळ देण्याचे संबंधित साखर कारखान्यांना आदेश

100 percent FRP from eleven factories | अकरा कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी

अकरा कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी

Next

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अकरा साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असून, उर्वरित कारखान्यांनी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत, असे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी साखर कारखान्यांना दिले. एफआरपी, साखर निर्यात व आगामी गळीत हंगाम याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखाना प्रतिनिधींची बैठक झाली.
कारखान्यांचा हंगाम संपून पंधरा ते वीस दिवस झाले आहेत, अद्याप काही कारखान्यांनी ८० टक्के एफआरपी अदा केलेली नाही त्यांच्यावर ‘परवाना रद्द’ची कारवाई केली आहे. उर्वरित एफआरपी दि. ३० एप्रिलपर्यंत देण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्याचा आढावा या बैठकीत घेतला. त्यात अकरा कारखान्यांनी ंपूर्ण एफआरपी अदा केली आहे. बहुतांशी कारखान्यांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगितले. उर्वरित कारखान्यांना तत्काळ देण्याचे आदेश सहसंचालकांनी दिले.
केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार किती जणांनी साखर निर्यात केली याचा आढावाही घेण्यात आला. निर्यातीचा वेग चांगला असला तरी प्रत्येकाने कोटा पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुष्काळ ग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रत्येकी दहा लाख रुपये लवकर द्या, त्याचबरोबर पंधरा लाखांची आपआपल्या कार्यक्षेत्रात जलसंधारणाची कामे करण्याची सूचनाही करण्यात आली.
पैसे द्या : ‘वारणा’, ‘पंचगंगा’ला सुनावले
‘परवाना रद्द’ची कारवाई केलेल्या ‘वारणा’, ‘पंचगंगा’सह इतर कारखान्यांच्या प्रतिनिधींना चांगलेच सुनावले. तत्काळ शेतकऱ्यांचे पैसे द्या, अन्यथा यापेक्षा कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पातळीवरून असल्याचे सांगितले.
कारवाईस भाग पाडू नका...
साखर उद्योग सावरला पाहिजे, या भावनेतून केंद्र व राज्य सरकारने चांगली मदत केली असतानाही कारखाने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांची बिले देत नाहीत. याबद्दल बैठकीत सहसंचालकांनी तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही मोजक्याच कारखान्यांनी दुष्काळ निधी दिला आहे. बाजारात साखरेचा दर वधारला असतानाही एफआरपीबाबत टाळाटाळ केली जात आहे. निर्यातीकडेही कारखाने दुर्लक्ष करीत आहेत. या सगळ््या गोष्टींचा मुख्यमंत्री स्वत: आढावा घेणार आहेत. निर्यात वाढविली नाही तर आॅक्टोबरमध्ये देशाच्या एकूण साखरेपैकी निम्मी साखर एकट्या महाराष्ट्रातच असेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.

स्वतंत्र बैठक
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांची स्वतंत्र बैठक झाली. त्यास साखर उपसंचालक दिग्विजय राठोड, शाहू साखर कारखान्याचे व्यवस्थापक संचालक विजय औताडे, ‘भोगावती’चे एस. एस. पाटील, दत्त शिरोळचे एम. व्ही. पाटील, ‘जवाहर’चे बबलू कलावंत, डी. वाय. पाटील कारखान्याचे पाटील, राजाराम कारखान्याचे राजेंद्र चौगलेंसह खासगी कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यांनी दिली १००% एफआरपी
शाहू-कागल, दत्त-शिरोळ, डी. वाय. पाटील-असळज, शरद-नरंदे, क्रांती-कुंडल, सोनहिरा, विश्वासराव नाईक, किसन अहिर, मोहनराव शिंदे, देवगिरी, उदगिरी.
मुख्यमंत्री साहाय्यता
निधी देणारे कारखाने
शाहू, बिद्री, दत्त-शिरोळ, जवाहर, मंडलिक, क्रांती.

साखर निर्यातीत कोल्हापूरची बाजी
दीड कोटी क्विंटल विक्री : ३० लाख क्विंटल साखर निर्यात
कोल्हापूर : केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार साखर निर्यात करण्यात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. आतापर्यंत ३५ लाख ६१ हजार ५४५ क्विंटल साखर कोट्यापैकी तब्बल ३० लाख ५४ हजार ८९९ क्विंटल साखर निर्यात केली असून, काही कारखान्यांचा अपवाद वगळता बहुतांशी कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक निर्यात केली आहे. निर्यातीबरोबर साखर विक्रीतही विभागाने आघाडी घेतली असून, दीड कोटी क्विंटल साखरेची विक्री केली आहे.
साखरेचे दर कोसळल्याने संपूर्ण हंगाम अडचणीत आला होता. एफआरपी व राज्य बॅँकेकडून मिळणारी रक्कम यामध्ये तफावत असल्याने कारखान्यांसमोर पेच निर्माण झाला होता. देशांतर्गत बाजारपेठेतील साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीचे धोरण अवलंबिले. यामध्ये प्रत्येक कारखान्याला उत्पादनाच्या १२ टक्के कोटा ठरवून दिला. सप्टेंबर २०१६ पर्यंत ही साखर निर्यात केल्यास प्रतिटन ४५ रुपये प्रोत्साहन अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या आवाहनाला कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, सरासरी ८५ टक्के साखर निर्यात केली आहे. विभागाला ३५ लाख ६१ हजार ५४५ क्विंटल निर्यात कोटा होता, त्यापैकी ३० लाख ५४ हजार ८९९ क्विंटल साखर निर्यात केली आहे. दरात चढउतार असल्याने साखर विक्रीवर जरी परिणाम झाला असला, तरी विभागातील कारखान्यांनी सर्वाधिक साखर विक्री केली आहे. यंदाच्या हंगामात दोन कोटी ८५ लाख ५७ हजार २२५ क्विंटल साखर उत्पादन झाले. त्यात गत वर्षीची ७९ लाख ४२ हजार ६३६ क्विंटल शिल्लक साखर होती. यापैकी एक कोटी ५१ लाख ७२ हजार क्विंटल साखर विक्री झाली आहे. अद्याप कारखान्यांच्या गोडावूनमध्ये दोन कोटी १३ लाख २८ हजार क्विंटल साखर शिल्लक आहे.

Web Title: 100 percent FRP from eleven factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.