‘आयटीआय’तून रोजगाराची शंभर टक्के हमी
By admin | Published: June 16, 2017 01:03 AM2017-06-16T01:03:33+5:302017-06-16T01:03:33+5:30
आॅनलाईनमुळे प्रवेश प्रक्रिया पारदर्शक : यतीन पारगावकर
दहावी पास व नापासांना अल्पमुदतीचे किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षण आणि ते पूर्ण झाल्यानंतर शंभर टक्के व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची हमी म्हणजे ‘आयटीआय’ होय. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात अल्प शिक्षणात नोकरी किंवा व्यवसायाभिमुख शिक्षणाबद्दल अनेक प्रश्न घोळत असतात. अशा या मनातील प्रश्नांना उत्तरे व मार्ग सांगणारे कोणीतरी हवे असते. त्यातील मर्म सांगण्यासाठी तसेच व्यवसायाभिमुख शिक्षणाची माहिती देण्याकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय)चे प्राचार्य यतीन पारगावकर यांच्याशी साधलेला थेट संवाद.
प्रश्न : आपल्याकडे मिळणाऱ्या किमान कौशल्यावर आधारित शिक्षणातून रोजगाराची शंभर टक्के हमी कशी मिळते?
उत्तर : आजकाल अनेक कोर्सेस व पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यात कोर्ससाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च न परवडणारा असतो. त्यात एकच आशा असते, ती म्हणजे महागड्या शिक्षणानंतर नोकरी मिळणे अपेक्षित असते. मात्र, घडते उलटेच. नोकरी काही केल्या लवकर मिळत नाही. मग त्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात काळजीच्या रूपाने अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी अल्प मुदतीचे व्यवसायाभिमुख व कौशल्यावर आधारित शिक्षण घेतल्यास त्या विद्यार्थ्याची आयुष्यभराची नोकरी, व्यवसायाची चिंताच मिटते; कारण हे अल्पमुदतीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘आयटीआय’च्या परिसरातच राज्यातील बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी येऊन मुलांना प्रथम ‘शिकाऊ उमेदवार’ म्हणून निवडतात. अशा मुलाखतींमध्ये १०० टक्के मुलांना नोकरी मिळते. त्यामुळे अशी हमी केवळ ‘आयटीआय’मधील शिक्षणातूनच मिळते. यातील ९० टक्के विद्यार्थी नोकरीकडे, तर १० टक्के व्यवसायाकडे वळतात.
प्रश्न : उद्याचा भारत घडविण्यासाठी काय धोरण अवंलबिले जाते?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ व ‘स्किल इंडिया’ यासारखे विशेष कार्यक्रम या संस्थेत सातत्याने राबविले जातात. प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्ययुक्त व गुणवत्ताधारक प्रशिक्षण मिळावे हा सरकारचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थी घडविले जातात. सरकारच्या धोरणानुसार राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’ या योजनेअंतर्गत विविध नवीन उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे या आस्थापनांना उच्च कौशल्यधारक व गुणवत्ता असलेले उमेदवार उपलब्ध करून देण्याचे काम राज्यातील अशा औद्योगिक संस्था करीत आहेत. कुशल कारागिरांची वाढती मागणी पाहता दरवर्षी १३६६ जागांसाठी पाचपट अर्ज येतात. यासह संस्थेत सीएनसी, व्हीएमसी, प्रगत व्यवसाय प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थी घडविले जातात.
प्रश्न : संस्थेतून शिक्षणानंतर कुठल्या आस्थापनात विद्यार्थ्यांना अधिक मागणी आहे?
उत्तर : कोल्हापूरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून शिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना शासनातील विविध विभागांमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळत आहेत. यात राज्य परिवहन मार्ग महामंडळ, महावितरण, के.एम.टी. यांचा समावेश आहे. खासगीमध्ये पुणे, मुंबई येथील टाटा मोटर्स, लार्सन अॅँड टुब्रो, वालचंद इंडस्ट्रीज, किर्लोस्कर, व्हर्लपूल, जनरल मोटर्स, फोर्ज मोटर्स, व्होक्सवॅगन, न्यूमॅटिक व स्थानिक घाटगे-पाटील इंडस्ट्रीज, मनुग्राफ, मेनन अॅँड मेनन, आदी कंपन्यांमध्ये त्यांची निवड होते. तीही संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडताना होते. यंदा तर ४२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यासह जिल्ह्यातील १४३० आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या २९९६ जागा मंजूर आहेत. यातून विविध कंपन्यांमध्ये २११९ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. यात प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतनही मिळते. याशिवाय कौशल्य दाखविल्यानंतर तत्काळ कायम नोकरीची संधी मिळते.
प्रश्न : कुठल्या व्यवसाय शिक्षणाला अधिक मागणी आहे?
उत्तर : विद्यार्थ्यांचा कल यांत्रिक, डिझेल, पत्रेकारागीर, यांत्रिक कृषिज्ञ, टूल अॅँड डायमेकर, मशीन ट्रेड, मेकॅनिक ग्राइंडर, तारतंत्री, रंगारी, आरेखक यांत्रिकी, आरेखक स्थापत्य, टर्नर, फिटर, इलेक्ट्रोप्लेटर, गवंडी, प्लंबर, आदी व्यवसायांना विद्यार्थी अधिक पसंती देत आहेत. कारण या कोर्समुळे तत्काळ नोकरी मिळण्याची हमी आहे. विशेषत: पंतप्रधान मोदींनी ‘मला उद्याचा बलवान देश घडवायचा असेल तर आयआयटीएन्स नको आहेत, तर मला आयटीआय झालेले हवे आहेत,’ असे म्हटले आहे; त्यामुळे सरकारच्या धोरणांना अनुसरून हे कोर्स सुरू आहेत.
प्रश्न : संस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत?
उत्तर : अमृतमहोत्सव झालेल्या शासनाच्या या संस्थेची उभारणी स्वातंत्र्यपूर्व काळात १९४० साली झाली. खऱ्या अर्थाने १९६८ सालापासून कळंबा रोड येथे ३० एकर विस्तीर्ण जागेत ३१ व्यवसायिक कोर्स उपलब्ध केले आहेत. एक वर्ष मुदतीच्या अभियांत्रिकी नऊ व्यवसायामध्ये एकूण ४१९, तर एक वर्ष मुदतीच्या बिगरअभियांत्रिकी सहा व्यवसायांमध्ये एकूण १९३ व दोन वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी पंधरा व्यवसायांमध्ये ७५४ जागा आहेत. प्रवेशासाठी किमान १४ वर्षे पूर्ण व कमाल वयोमर्यादेची अट
नाही. दरवर्षी अनेक उद्योजक घडविणारी
संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आहे. आॅनलाईन अर्जप्रणालीमुळे प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होते.
-सचिन भोसले