शंभर टन गुलाल...कोटीचे फुटणार फटाके, कोल्हापुरात जल्लोषाची तयारी
By admin | Published: February 20, 2017 06:53 PM2017-02-20T18:53:35+5:302017-02-20T18:53:35+5:30
निवडणुका कोणत्याही असोत, विजयानंतर आनंद द्विगुणीत करण्यासाठी समर्थकांसह उमेदवार गुलालाच्या उधळणीत रंगला पाहिजेच.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 - निवडणुका कोणत्याही असोत, विजयानंतर आनंद द्विगुणीत करण्यासाठी समर्थकांसह उमेदवार गुलालाच्या उधळणीत रंगला पाहिजेच. तरच निवडणुका जिंकल्याचा आनंद सर्वत्र कळतो. यासह विजय झालेला कळावा म्हणून मोठ्या आवाजाचे फटाके उडवून आनंद व्यक्त केला जातो. यासाठी सुमारे कोट्यवधीचे फटाके आणि शंभर टनाहून अधिक गुलाल विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार निवडून येवो अगर न येवो; पण त्याच्या स्वागतासाठी किमान दोन ते पाच हजारांचे फटाके हमखास गावात उडविले जातात. गेल्या आठवडाभरात प्रचाराचा धमाकाही गावागावांत होता. त्यात फटाक्यांची विक्रीही तडाखेबंद झाली आहे. निवडणुकांनंतर निकालादिवशीही मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीची शक्यता लक्षात घेऊन विक्रेत्यांनीही फटाक्यांचा स्टॉक मोठ्या प्रमाणात केला आहे. कोल्हापूर शहरासह गावागावांतील फटाके विक्रेतेही मोठ्या प्रमाणात सज्ज झाले आहेत. काही फटाके विक्रेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता सहा महिन्यांपूर्वीच आगावू मालाची आॅर्डर दिली आहे. त्यामुळे यंदा निकालानंतर मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये फटाक्यांचा धूर दिसणार, हे नक्की आहे.
निवडणुका म्हटले की हमखास एक उमेदवार निवडून येतो आणि विजयाचे प्रतीक असणाऱ्या गुलालाची मागणीही तितकीच वाढते. त्यामुळे रंग विक्रेत्यांनी गुलालही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मागविला आहे. यंदा इस्लामपूर, पंढरपूर, सोलापूर या भागातून शंभर टनाहून अधिक गुलाल मागविण्यात आला आहे. विशेषत: अधिक रंगतदार सरपंच गुलालास मोठी मागणी आहे. यंदा गुलालाच्या उधळणीसह कोट्यवधींच्या फटाक्यांचाही चुराडा बुधवारी होणाऱ्या निकालादिवशी अपेक्षित आहे. यासाठी रंग विक्रेते आणि फटाके विक्रेतेही सज्ज झाले आहेत. गुलालाचे एक पोते ५०० ते ६०० रुपये प्रति दहा किलोस आहे. तर एक किलो सुटा गुलाल घेतल्यास प्रति किलो ६० रुपये असा दर बाजारात आहे.