करवीरमध्ये ईर्ष्येने १०० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:26+5:302021-05-03T04:19:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी करवीर तालुक्यात ईर्ष्येने ६३९ पैकी ६३९ मतदारांनी (१०० टक्के) मतदानाचा हक्क बजावला. विवेकानंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी करवीर तालुक्यात ईर्ष्येने ६३९ पैकी ६३९ मतदारांनी (१०० टक्के) मतदानाचा हक्क बजावला. विवेकानंद महाविद्यालयात बारा केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आल्याने तणावाचे वातावरण होते.
करवीरमध्ये सर्वाधिक मतदार असल्याने ‘गोकुळ’च्या राजकारणात अधिक महत्त्व आहे. त्यात सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील व विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांचे होमपिच असल्याने याकडे सर्वांच्या नजरा होत्या. ठराव गोळा करण्यापासून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये चुरस पहावयास मिळाली. सकाळी पावणेदहा वाजता विरोधी आघाडीचे ठरावधारक एकत्रितपणे आणण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांनी पिवळे स्कार्फ, टोपी व मास्क घालूनच ठरावधारक ओळीने उभे केले. त्यानुसार मतदान केंद्रावर सोडण्यात आले.
दुपारी साडेबारा वाजता सत्तारूढ गटाचे ठरावधारक आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आले. आमदार पाटील हे मतदारांना केंद्राच्या प्रवेशद्वारावर सोडून ते मागे गेले. दुपारी तीनपर्यंत ९८ टक्के मतदान झाले होते. पाच-सहा मतदार राहिले होते, त्यांचा शोध सुरू होता. त्यांच्याशी संपर्क साधून आणण्यात आले. सायंकाळी पाच पर्यंत १०० टक्के मतदान झाले.
सत्तारूढ गटाचे हालचालीचे केंद्र ‘आंबा’
सत्तारूढ गटाने करवीरमधील ठरावधारक आंबा (ता. शाहूवाडी) येथे ठेवले होते. तिथेच गेले तीन-चार दिवस हालचाली सुरू होत्या. शनिवारी संध्याकाळी गटाला मानणाऱ्यांना एकत्रित केले. तिथे आमदार पी. एन. पाटील यांनी सूचना दिल्यानंतर रविवारी सकाळी त्यांना निगवे दुमाला (ता. करवीर) येथे आणून ठेवले. तेथून दुपारी साडेबारा वाजता मतदान केंद्रावर आणण्यात आले.
विरोधी गटाची तळसंदगे येथे व्यूहरचना
विरोधी आघाडीचे ठरावधारक तळसंदगे (ता. हातकणंगले) येथे ठेवले होते. तिथे शनिवारी रात्री पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आदींनी सभासदांचे प्रबोधन केले. तेथून लक्झरीमधून थेट मतदान केंद्रावर आणण्यात आले.
‘शेकाप’चे वेगवेगळे मतदान
विरोधी आघाडीने उमेदवारी डावलल्याने ‘शेकाप’ नाराज होते. केरबा भाऊ पाटील, संग्राम पाटील आदींनी पहिल्यांदा, तर माजी आमदार संपतराव पवार व बाबासाहेब देवकर यांनी त्यानंतर मतदान केले.
पिवळ्या टोप्या आणि
विरोधी आघाडीच्या सभासदांसह समर्थकांनी पिवळ्या रंगाचे स्कार्फ, मास्क व टोप्या घातल्या होत्या, तर सत्तारूढ गटाच्या ‘आमचं चांगलं चाललंय’ असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या होत्या. दोन्हीकडील टोप्या सर्वांचे लक्ष वेधत होत्या.
थर्मल स्कॅनिंग करूनच प्रवेश
मतदारांना थर्मल स्कॅनिंग करूनच केंद्रात प्रवेश दिला जात होता. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी डबल मास्क, फेसशिल्डचा वापर केला होता.
दोघांनी केले पीपीई कीट घालून मतदान
तालुक्यातील दोन मतदार हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना थेट रुग्णालयातून मतदान केंद्रावर आणले. पीपीई कीट घालून त्यांनी मतदान केले, तर बालिंंगे येथील आनंदराव यादव हे आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून त्यांना मतदानासाठी आणले होते.
विश्वास पाटील यांच्या तीन पिढ्यांनी केले मतदान
‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या घरासह नातेवाइकांमध्ये सुमारे ८० ठराव होते. त्यांचे सारे कुटुंबच मतदान केंद्रावर आले होते. विश्वास पाटील यांच्यासह त्यांचे भाऊ तुकाराम, सुपुत्र सचिन, पुतणे सुनील व नातू पार्थ व नात श्रृती यांनी मतदान केले.
विश्वास पाटील यांचे पहिले मतदान
विश्वास पाटील यांनी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी मतदान केले. त्यानंतर तुरळक मतदान सुरू झाले.
घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला
पालकमंत्री सतेज पाटील यांचा यजघोष करतच विरोधी आघाडीचे ठरावधारक आले, तर आमदार पी. एन. पाटील यांच्या घोषणा देत सत्तारूढ गटाचे ठरावधारक आले. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
नविद, वीरेंद्रसह सरुडकरांनी दिली भेट
करवीरच्या मतदान केंद्रावर सकाळी माजी आमदार संजय घाटगे, चंद्रदीप नरके, बाबासाहेब पाटील-सरुडकर, नविद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, चेतन नरके, विश्वास जाधव, रणजितसिंह पाटील, अनुराधा पाटील यांनी भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला.