प्रदूषणाने रंकाळ्यात १०० वर्षांचे कासव मृत : दुर्मीळ इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:57 AM2018-06-19T00:57:27+5:302018-06-19T00:57:27+5:30
आदित्य वेल्हाळ।
कोल्हापूर : रंकाळ्यात राहणारा व तलावाच्या जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेला इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल (मऊ पाठीचा कासव) हा रंकाळ्यातील प्रदूषणाचा बळी ठरला. त्याचे वजन सुमारे ९० किलो होते. त्याचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. जंगली वाघाइतकेच संरक्षित असणारे हे मऊ पाठीचे गोड्या पाण्यातील कासव सोमवारी रंकाळ्यात मृतावस्थेत आढळून आले.
सोमवारी दुपारी रंकाळा तलावात पद्माराजे उद्यानासमोर दोन तरुणांना कासव तरंगताना दिसले. याबाबतची माहिती तरुणांनी ‘लोकमत’ला दिली. या कासवाला रंकाळा बचाव समितीचे शाहीर राजू राऊत, अमर जाधव, राजू पाटील यांनी पाण्यातून बाहेर काढले. त्याची लांबी साडेचार फूट होती व त्याच्या अंगावर कोणतीही जखम नव्हती. ते प्रदूषित पाण्यामुळे मृत झाले आहे, अशी शक्यता यावेळी पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
कासवासारखा उभयचर प्राणी मृत होत असेल, तर रंकाळा तलावातील जैवविविधता संपत आल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे काही दिवसांत जैवविविधतेत मृत पाण्याचा साठा म्हणून रंकाळा तलावाला घोषित करावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
कोल्हापूरची ओळख असणारा रंकाळा तलाव हा पूर्वीपासूनच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. चित्रपटांतून, चित्रकारांच्या कुंचल्यातून त्याची नैसर्गिक विविधता जितकी आकर्षित करते, त्याहूनही जैवविविधतेने तो समृद्ध आहे. स्थलांतरित पक्षी, उदमांजर, कीटक, सरपटणारे प्राणी, मासे या सर्वांसाठी आश्रयस्थान हा तलाव आहे.; पण गेल्या काही वर्षांत या तलावाचे प्रदूषण होत आहे. त्याची किंमत रंकाळ्यातील जलचरांना व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना मोजावी लागत आहे.
इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल कासव वाघाइतकेच संरक्षित आहे. या जातीची अनेक कासव या तलावात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रंकाळा तलाव संरक्षित घोषित करावा.
- प्रा. डॉ. जय सामंत, पर्यावरण तज्ज्ञ