नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेच्या माध्यमातून दोन कॅन्सरग्रस्तांना १० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:50 AM2020-12-05T04:50:17+5:302020-12-05T04:50:17+5:30
डॉ. अभिजित जाधव यांच्या संकल्पनेतून ‘नो शेव्ह’ नोव्हेंबर कँपेन फॉर कॅन्सर पेशंट उपक्रमांतर्गत वारणा कॅन्सर फौंडेशनने केलेल्या आवाहनाला समाजातील ...
डॉ. अभिजित जाधव यांच्या संकल्पनेतून ‘नो शेव्ह’ नोव्हेंबर कँपेन फॉर कॅन्सर पेशंट उपक्रमांतर्गत वारणा कॅन्सर फौंडेशनने केलेल्या आवाहनाला समाजातील दानशूरांनी चांगला प्रतिसाद दिला. मोहिमेचे दहावे वर्ष असून, मोहिमेतून संकलित झालेल्या रकमेतून अशोक शिंदे (पारगाव), मंगल हिरवे (माले) या दोन गरजू कॅन्सरग्रस्तांना कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे आणि कॅन्सरवर यशस्वीरीत्या मात केलेले बहिरेवाडी गावचे महादेव सरनाईक यांच्या हस्ते प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. समाजामध्ये लोक आम्हाला वेगळ्या नजरेने बघतात, सापत्न वागणूक देतात; पण वारणा कॅन्सर फाउंडेशनने ‘नो शेव्ह’ नोव्हेंबरच्या माध्यमातून समाजामधील ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा आम्हाला आर्थिक फायदा पण झालेला आहे. याबद्दल आम्ही वारणा कॅन्सर फाऊंडेशनचे ऋणी आहोत. यावेळी हिम्मत कुंभार, राजेंद्र जाधव, प्रथमेश पाटील, राजकुमार जाधव, प्रवीण पाटील, संदीप जाधव उपस्थित होते. राजू जमदाडे यांनी आभार मानले.