शिक्षणासाठीच्या आधाराची ‘शंभरी’

By admin | Published: May 20, 2015 12:25 AM2015-05-20T00:25:17+5:302015-05-20T00:27:43+5:30

सारस्वत वसतिगृहाची शताब्दीपूर्ती : गुणवत्तेच्या निकषांचा दंडक आजही कायम

The '100th Century' | शिक्षणासाठीच्या आधाराची ‘शंभरी’

शिक्षणासाठीच्या आधाराची ‘शंभरी’

Next

राजर्षी शाहू महाराज यांच्या मदतीतून साकारलेल्या श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृहाने गुणवत्तेच्या निकषाचा दंडक आजही जोपासला आहे. प्रतिकूल परिस्थितीतील, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या वसतिगृहाने शंभरी ओलांडली आहे. ‘शिक्षण व सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या सारस्वत समाजाने राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे काम वसतिगृहाच्या माध्यमातून केले आहे. आज, बुधवारी या वसतिगृहाचा शताब्दीपूर्तीचा सोहळा होत आहे. त्यानिमित्त वसतिगृहाच्या वाटचालीचा हा आढावा.

जात, धर्म आणि पंथविरहित गुणवत्तेनुसार प्रवेश या वसतिगृहात दिला जातो. निव्वळ वसतिगृह नाही, तर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यांना चांगले विचार समजावेत यासाठी व्याख्याने घेतली जातात. वसतिगृहातर्फे सामाजिक संस्थांना मदत केली जाते. त्यासह गरीब, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. आतापर्यंत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील शेकडो विद्यार्थ्यांना वसतिगृहाने शिक्षण, नोकरीसाठी बळ दिले आहे.
वीस वर्षांत ६७ लाखांची मदत
वसतिगृहामार्फत ‘शिक्षण साहाय्य योजना’ राबविली जाते. १९९४ ते मार्च २०१४ अखेर विविध उपक्रमांतर्गत एकूण ४ हजार १४१ विद्यार्थ्यांना ६७ लाख ५२ हजार ३०० रुपयांचे वितरण केले आहे. त्यात शिष्यवृत्ती व पारितोषिकांपोटी २ हजार ९४३ विद्यार्थ्यांना ३० लाख ६७ हजार ३८० रुपये, बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तींतर्गत २७४ जणांना २७ लाख ३७ हजार ७२०, संशोधन साहाय्यासाठी ३ विद्यार्थ्यांना १५ हजार आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार निवासी शिष्यवृतींतर्गत ८८४ विद्यार्थ्यांना ३ लाख ८१ हजार ७०० रुपयांचे वितरण केले आहे. सामाजिक संस्थांना साहाय्य म्हणून ३७ संस्थांना ५ लाख ५० हजार ५०० रुपयांची मदत केली आहे. त्यासह १०७ विद्यार्थ्यांना एकूण १८ लाख ७५ हजार ४९० रुपयांची ‘बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती’ दिली आहे.
ई-लायब्ररी, स्पर्धा
परीक्षा केंद्राचा मानस
गुणवत्तेच्या निकषांवर सर्व समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. शिवाय शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते, असे वसतिगृहाच्या अध्यक्षा डॉ. यशस्विनी जनवाडकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सध्या वसतिगृहात १०५ मुलांच्या राहण्याची सुविधा आहे. केवळ राहण्याची सोय नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. भविष्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ई-लायब्ररी, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, मराठी बालवाडी, शाळा सुरू करण्याचा मानस आहे. वसतिगृहाच्या इतिहासातील मी पहिली महिला अध्यक्षा आहे. वसतिगृहाला शिक्षणाचे व्यापक केंद्र बनविण्याचा माझा प्रयत्न आहे. आपलं घर, गाव सोडून कोल्हापुरात आलेल्या विद्यार्थ्यांना मातेची माया, प्रेम देणाऱ्या वसतिगृहाने शंभरी ओलांडली आहे. त्याचे स्वरूप बदलले असले, तरी तेथील आपुलकी, जिव्हाळा पूर्वीचाच आहे.
- संतोष मिठारी, कोल्हापूर




वसतिगृह असे उभारले
सारस्वत समाजास वसतिगृहासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी भूखंड व आर्थिक मदत दिली. श्रीमती सरस्वतीबाई गणेश लाटकर यांनी वसतिगृहाच्या उभारणीसाठी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या देणगीतून सारस्वत बोर्डिंगची स्थापना २० मे १९१५ रोजी झाली. त्याचे उद्घाटन राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. आतापर्यंत वसतिगृहाची धुरा रावबहाद्दूर शिरगावकर, ए. बी. ओळकर, प्रा. व्ही. ए. देसाई, शांताराम दाभोळकर, सीताराम शिरगांवकर, दामोदर तारळेकर, म. ग. लाटकर, आदींनी सांभाळली आहे. त्यांच्या योगदानामुळेच वसतिगृहाचा विस्तार झाला. दगडी, कौलारू ११ खोल्यांची इमारतीचा के. डी. कामत यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विस्तार करण्यात आला.

Web Title: The '100th Century'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.