एकरी १०५ टन उसाचे उत्पादन
By Admin | Published: February 3, 2015 12:18 AM2015-02-03T00:18:30+5:302015-02-03T00:27:22+5:30
शिरढोणमधील शेतकऱ्याचे कौशल्य : योग्य नियोजन, आंतरपिकातून निघाला खर्च
कमी कष्ट, योग्यवेळी होणारे पाण्याचे नियोजन, खतांची मात्रा, कारखान्याकडून उसाला मिळणारा प्रतिटन दर, आदी बाबींचा विचार करता पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी ऊसपिकाकडेच अधिक झुकला. परिणामी, पट्ट्यात उसांचे उत्पादन वाढले, तर साखर कारखान्यांचीही संख्या मुबलक आहे. पण खर्च कमी करून योग्य नियोजन केल्यास उसाचेही उत्पादन वाढविता येते, हे शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकरी आण्णा बाबू मुंगळे आणि त्यांचा मुलगा बाबूराव मुंगळे यांनी दाखवून दिले आहे.
एकरातून त्यांनी १०५ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले. विशेष म्हणजे पाटपाण्यावर त्यांनी विक्रमी उत्पादनाची किमया साधली आहे.
मशागतीपासून ऊस तोडणीपर्यंत त्यांना एकरासाठी ५० हजारांचा उत्पादन खर्च आला. उसात त्यांनी कोथिंबिरीचे आंतरपीक घेऊन त्यापासून १८ हजारांचे उत्पादन घेतले. त्यामुळे एकरात एकूण अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
मुंगळे यांनी १६ जुलै २०१३ रोजी ६० गुंठे क्षेत्रात पाच फूट सरीमध्ये दोन फूट अंतरावर ‘को-०२६५’ वाणाच्या उसाची लागवाड रोपपद्धतीने केली. पट्ट्यामध्ये कोथिंबीर लागवडही केली. रोप लागणीनंतर शुगर -१००, ड्रीपची एकरी पाच लिटरप्रमाणे आळवणी केली व दीड महिन्यानंतर २० दिवसांच्या अंतराने पाचवेळा अॅमिनो अॅसिड, ओझोन, जी. ए. सिक्वेल पोषक फवारण्याने फुटवे जोमदारपणे वाढले व ऊसही पोसला. पाण्याचे व्यवस्थापन करीत त्यांनी वापसा स्थिती राहील, याची काळजी घेतली. त्यामुळे ठिबक सिंचनाशिवायही उसाच्या एकरात १०० टनावर उत्पादन मिळू शकतो हे दाखवून दिले. खत व्यवस्थापनाकडेही काळजीपूर्वक लक्ष देताना बाळ भरणी, मुख्य भरणी व मे अखेरीस शेवटचा डोसचे नियोजन केले. एन. पी. के. सरोवर मॅग्नेशियम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रवे, झिंक, सिलकॉन, निर्मल सीडसचे बायोपॉवर ४० किलो, बोरॉन, गंधकाचाही वापर केल्याने उत्पादन मिळाले. दोन फुटाला रोपामुळे एकरी ४० हजार उसांची संख्याही राखता आली. एका उसाचे सरासरी वजन तीन किलोपर्यंत भरले. शिरोळ दत्त कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, पोपट चव्हाण, सुभाष देसाई, कृषी अधिकारी एस. बी. देशमुख, राजेश शहापुरे, विजय देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले.
- गणपती कोळी ल्ल कुरुंदवाड