७ वर्षांत १०५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू!
By admin | Published: December 3, 2015 10:38 PM2015-12-03T22:38:22+5:302015-12-04T00:23:39+5:30
सातारा जिल्ह्याची धक्कादायक आकडेवारी : शासनाकडून ८६७ वारसांना ८ कोटी ६७ लाख रुपयांची मदत; विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रदीप यादव -- सातारा सातारा जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत जवळपास १ हजार ५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यापेक्षाही पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक अशीच आहे. यासाठी प्रत्येक बळीराजाचा विमा असणे गरजेचे बनले आहे. शासन पातळीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे धोरण राबविले जात आहे. या अनुषंगाने विविध योजना सुरु करण्यात आल्या असून आजपर्यंत मृत्यू पावलेल्या ८६७ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाने ८ कोटी ६७ लाख रुपयांची मदत दिली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बिनभरवशाची झाली आहे. तरीही एक तरी हंगाम हाताला लागेल, या आशेने शेतकरी कर्ज काढून शेती पिकवतात. मात्र गेल्या दहा-बारा वर्षातील पर्जन्यमान पाहिले तर ऐन मोक्याला पावसाने घात केल्याचे पाहायला मिळते. जूनमध्ये कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबणीवर पडत राहिल्या. तर बरेचदा दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे प्रकार घडत आहेत. पेरण्या केल्यानंतर पीक काढायच्या वेळेलाच नेमका अवकाळी पाऊस येतो आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आणि जनावारांचा चारा सर्वकाही धुऊन नेतो, हेच गेल्या दहा वर्षातील चित्र आहे.
शेतीत काही पिकत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे विवाह, घर बांधणे, आजारपण यासाठी शेतकरी कर्ज घेतात आणि या फेऱ्यातून त्यांची सुटका काही होत नाही. त्यामुळे आत्महत्येचेही प्रमाण वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने २०१५-१६ मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत संरक्षण रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी जितेंद्र शिंदे यांनी दिली.
या योजनेचा कालावधी १२ महिन्यांचा असून १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत दिवसातील २४ तासांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्त व्यक्तीच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच अपघातावेळी त्यांचे वय किमान १० वर्षे व कमाल ७५ वर्षे असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांस अपंगत्व अथवा मृत्यू कोणत्याही प्रकारच्या अपघातानेच येणे आवश्यक आहे.
विमा हप्त्याची रक्कम कंपनीस अदा...
महसूल विभागाकडील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वयोगटातील सुमारे १ कोटी ३७ लाख खातेदारांचा प्रतिशेतकरी १९.८९ रुपयेप्रमाणे विमा हप्त्याची रक्कम शासनाने विमा कंपनीस अदा केली आहे. शेतकऱ्यास कोणतीही रक्कम अदा करावी लागणार नाही. अपघातग्रस्त शेतकरी व वारसांनी कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्क साधून प्रस्ताव सादर करावे.
- जितेंद्र शिंदे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा
या योजनेंतर्गत ग्राह्य अपघातांचे प्रकार
रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतूनाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात वा मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने, हल्ल्यामुळे जखमी किंवा मृत्यू, जनावरांच्या चावण्याने रेबीज होऊन मृत्यू, जखमी होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे, दंगल, अन्य कोणतेही अपघात याचा या योजनेत समावेश आहे.
१८९ कुटुंबे
मदतीपासून वंचित
२००८-१५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १०५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू झाला आहे. पैकी ८६७ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत दिली आहे. शेजजमीन नावावर नसणे, जवळच्या व्यक्तीकडून खून, वाहन अपघातात वाहन चालविण्याचा परवाना नसणे आदी कारणांमुळे १८९ शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नुकसानभरपाईचे स्वरुप
या योजनेच्या अपघात व नुकसानभरपाईचे स्वरूप असे आहे. अपघाती मृत्यू, अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी होणे, अपघातामुळे १ डोळा व १ अवयवय निकामी होणे यासाठी २ लाख रुपये व अपघातामुळे १ डोळा अथवा २ अवयव निकामी होणे, यासाठी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यईल.