शाहूवाडी तालुक्यातील १०७९ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:03+5:302021-05-26T04:25:03+5:30
सरुड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शाहूवाडी तालुक्यातील सुमारे १०७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर या लाटेत तालुक्यातील ५४ ...
सरुड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शाहूवाडी तालुक्यातील सुमारे १०७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर या लाटेत तालुक्यातील ५४ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या तालुक्यातील २६७ कोरोनाबाधित रुग्ण उपचारार्थ विविध रुग्णालयांत तसेच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.
गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले. एप्रिल महिन्यामध्ये दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत होती. मे महिन्यात तर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा मोठा विस्फोट झाला. तालुक्यातील भेडसगाव, सरुड, सुपात्रेपैकी हणमंतवाडी, मलकापूर, चरण, बांबवडे, ओकोली, आंबा, आदी गावांत रुग्णसंख्या वाढत गेल्याने ही गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहेत. दुसऱ्या लाटेत तालुक्यात १३४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी १०७९ रुग्णांनी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच कोरोनामुळे बळी पडलेल्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ५४ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये वयोवृद्ध व व्याधीग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख गेल्या आठवड्यात काही प्रमाणात खाली आल्याने स्थानिक प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला; परंतु कोरोना चाचण्या वाढविल्याने सोमवारी एकाच दिवशी तालुक्यात नवीन ६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. समूह संसर्ग टाळण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात सुपर स्पेडर्स मोहिमेंतर्गत कोरोना चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून ग्रामदक्षता समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावागावांत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.