कोल्हापुरातील १०८ सेवा ‘बेस्ट’

By admin | Published: March 28, 2016 12:47 AM2016-03-28T00:47:27+5:302016-03-28T00:51:33+5:30

३६ रुग्णवाहिका : लाभार्थी, चालकांनी केल्या सूचना; सांख्यिकी कार्यालयाचे मूल्यमापन

108 service 'best' in Kolhapur | कोल्हापुरातील १०८ सेवा ‘बेस्ट’

कोल्हापुरातील १०८ सेवा ‘बेस्ट’

Next

गणेश शिंदे -- कोल्हापूर --१०८ टोल फ्री (आपत्कालीन वैद्यकीय सेवा) या सेवेबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी (रुग्ण), त्यांच्या नातेवाइकांनी ही सेवा अत्यंत दर्जेदार व चांगली असल्याचे मत नोंदविले आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने १०८ वैद्यकीय आपत्कालीन सेवेच्या मूल्यमापनाचा सर्व्हे पूर्ण केला आहे. त्याचा अभिप्राय पुण्यातील नियोजन कार्यालयाला पाठविला आहे.
या मूल्यमापनामध्ये रुग्णवाहिकेमध्ये महिला डॉक्टर्सचा समावेश वाढविणे योग्य होईल, रुग्णवाहिकांची संख्या लोकसंख्या निकषावर न ठरविता भौगोलिक स्थिती, उपलब्ध सोयी, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर अपघात, आपत्तींचे प्रमाण, आदींचा निकषामध्ये समावेश असावा. त्याचबरोबर या रुग्णसेवेची जास्तीत जास्त जनजागृती व्हावी, अशा ठळक नोंदी लाभार्थी (रुग्ण), त्यांचे नातेवाईक, चालक, डॉक्टरांनी नोंदविल्या आहेत.
आपत्कालीन स्थितीत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वीस टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचा एक भाग म्हणून राज्यभरात या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे मूल्यमापन केले गेले. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे, असे रुग्ण, नातेवाईकांंकडून या सेवेची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी यांनी घेतली. सुमारे दीड महिना सांख्यिकी कार्यालयाकडून मूल्यमापन सुरू होते. मूल्यमापनाचे काम संशोधन सहायक सु. मा. आवळकर, सांख्यिकी सहायक अधिकारी प्रशांत चावरे, सागर पाटील, राजेश पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)

याची घेतली माहिती...
या १०८ रुग्णवाहिकेमधील सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णवाहिकेमध्ये किती उपकरणे आहेत, त्यांच्याकडे मान्यताप्राप्त पदवी आहे का, चालकाकडे वाहन परवाना आहे का?, त्याला ‘बीव्हीजी’कडून १८ दिवसांचे वाहन प्रशिक्षण दिले आहे का, याची माहिती लाभार्थ्यांकडून सांख्यिकी कार्यालयाने घेतली.

उपाययोजना
या योजनेची व्यापक प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. यासाठी रेडिओ, दूरदर्शन, आदी माध्यमांचा प्रभावी वापर होऊ शकतो. तसेच ग्रामपंचायत कार्यालये, शाळा/ महाविद्यालये, राज्य परिवहन बसेस, आदींमध्ये भित्तीपत्रके लावावीत.
रुग्णवाहिकेमधील सर्व उपकरणे चालू स्थितीत ठेवण्यावर भर दिला गेला पाहिजे.
रुग्णवाहिकेमधील रुग्णाला शासकीय रुग्णालयात उपचार अथवा दाखल करण्यास शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी नियमावली असणे आवश्यक आहे.


अडचणी
प्रसूती वेदनेवेळीही १०८ची रुग्णवाहिका गेल्यास जर अन्यत्र गंभीर परिस्थिती उद्भवली, तर तेथे वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकत नाही.
डॉक्टर व रुग्णवाहिका चालक यांना ठरावीक कालावधीनंतर प्रशिक्षण दिले जात नाही.
रुग्णवाहिका स्वच्छतेचे काम संबंधित रुग्णालयाच्या चालकास करावे लागते.
रुग्णवाहिकांची संख्या कमी.
सर्पदंशाच्या रुग्णांसाठीची औषधे रुग्णवाहिकेत उपलब्ध नाहीत.
रुग्णवाहिकेतील डॉक्टर व वाहनचालक यांना बसण्यासाठी /विश्रांतीसाठी स्वतंत्र कक्ष नाही.

Web Title: 108 service 'best' in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.