सांडपाण्यावर फुलविली ११ एकर बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:19 PM2019-05-19T19:19:10+5:302019-05-19T19:19:14+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाने ११ एकर परिसरामधील बाग ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाने ११ एकर परिसरामधील बाग फुलविली आहे. दर दिवशी ८० हजार लिटर पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासह पाणी बचतीचे पर्यावरणपूरक पाऊल या माध्यमातून विद्यापीठाने टाकले आहे.
वसतिगृहातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते विद्यापीठ परिसरातील विविध बागांसाठी वापरण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला. त्यानुसार सन २००७ मध्ये या विभागाने मुलींच्या वसतिगृहामागे पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून दर दिवशी ५० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया केलेल्या पाण्यातून ग्रंथालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतींसमोरील बगीचा, उत्तर बाजूचे सर्कल आणि त्यातील झाडे, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर आणि मुलींच्या वसतिगृहासमोरील बगीचा फुलविला आहे.
दहा एकरांतील परिसर हिरवागार केला आहे. पहिला प्रकल्प यशदायी ठरल्याने सन २०१३ मध्ये तंत्रज्ञान अधिविभागातील मुले आणि मुलींच्या वसतिगृह परिसरात प्रतिदिन ३० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा जैविक प्रकल्प सुरू करण्यात आला.
या प्रकल्पातील पाण्यातून या विभागाच्या परिसरातील सव्वा एकरमधील बगीचाला पाणीपुरवठा केला जातो.
तिसरा प्रकल्प कार्यान्वित
विद्यापीठातील विविध विभाग, कॅँटीनला प्रशासनाकडून ‘आरओ’ फिल्टर पाणी पुरविले जाते. ‘आरओ’तून जे क्षारयुक्त पाणी बाहेर पडते. ते वाया जाऊ नये यासाठी त्या परिसरात नारळाच्या झाडांची बाग केली आहे. आता गेल्या महिन्यात पाच बंगला परिसरात २० हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारा तिसरा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यातून उपलब्ध होणारे पाणी हे संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागासमोरील टेकडी आणि दूरशिक्षण केंद्राच्या परिसरातील झाडांना पुरविले जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळालेल्या पाण्यातून बगीचा, झाडे फुलविण्याचा विद्यापीठाचा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे.