जिल्ह्यातील आठ एसटी बसस्थानकांचे रुपडे पालटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 03:56 PM2022-02-18T15:56:53+5:302022-02-18T15:57:14+5:30
बसस्थानकांचे नुतनीकरण होणार असल्याने प्रवाशांना आता चांगल्या सुविधा मिळणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीची वाट पाहत बसायला लागणाऱ्या जिल्ह्यातील आठ बसस्थानकांचे आता रुपडे पालटणार आहे. या बसस्थानकांच्या नूतनीकरासाठी ११ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यांची कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
त्यामुळे जिल्ह्यातील ही आठ बसस्थानके आता नव्या रुपात दिसणार आहेत. यामध्ये इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल, वडगांव, जयसिंगपूर, वाठार, गगनबावडा व मलकापूर या बसस्थानकाचा समावेश आहे. यामध्ये नवीन इमारतीसह सुशोभीकरण, काँक्रिटीकरण, प्रसाधनगृह, हायमास्ट दिवे आदी कामे होणार आहेत.
जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र अनेक बसस्थानकांची दुरावस्था झाली होती. या बसस्थानकांचे नुतनीकरण होणार असल्याने प्रवाशांना आता चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
जिल्ह्यातील बसस्थानकांना मिळणारा निधी पुढीलप्रमाणे -
इचलकरंजी, गडहिंग्लज बसस्थानक नूतनीकरण - प्रत्येकी रु. २ कोटी
वडगांव बसस्थानक नूतनीकरण - रु. १.४४ कोटी
कागल, गगनबावडा व मलकापूर बसस्थानक नूतनीकरण - प्रत्येकी रु. १ कोटी
जयसिंगपूर बसस्थानक विस्तारीकरण - रु. २ कोटी
वाठार बसस्थानक पुनर्बांधणी - रु. १.५ कोटी