जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासासाठी ११ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:03+5:302021-01-01T04:18:03+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील ११ आमदारांसाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध झाला आहे. ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील ११ आमदारांसाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध झाला आहे. जरी निधी मिळाला असला तरीदेखील २२ जानेवारीपर्यंत यातून विकासकामे करण्यावर आचारसंहितेमुळे बंधने येणार आहेत.
विद्यमान आमदारांची निवड ही नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली. परंतु, महाविकास आघाडी सत्तेवर येण्यासाठी विलंब झाला. सरकार सत्तेवर येऊन कार्यप्रवण झाले आणि त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. केंद्र सरकारने खासदारांचा निधी गोठविला आणि राज्य सरकारलाही त्याचे अनुकरण करावे लागले. त्यामुळे आमदार निधी काही काळासाठी थांबविण्यात आला. कारण राज्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च सुरू झाला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
याचदरम्यान वित्तमंत्री अजित पवार यांनी एकूण तीन कोटी रुपये आमदार निधी देणार असल्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्या टप्प्यात आमदार निधीसाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यातील ५० टक्के रक्कम कोविड उपाययोजनांसाठी आणि उर्वरित ५० टक्के विकासकामांसाठी अशी अट घालण्यात आली. आमदारांनीही याच पद्धतीने आपल्या मतदारसंघात निधी खर्च केला आहे. दरम्यान, २१ डिसेंबर २० रोजी पुन्हा प्रत्येक आमदारासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तो जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाला आहे.
चौकट
रस्त्याच्या कामांना प्राधान्य
प्रत्येक आमदाराच्या कामांवर नजर टाकली, तर सर्वाधिक कामे ही रस्त्याची असल्याचे स्पष्ट होते. केवळ दोन कोटी रुपयांच्या निधीमधून कामे करताना आमदारांची दमछाक होत असल्याने अधिक लोकसंख्येच्या गावांना डोळ्यांसमोर ठेवून नियोजन करण्यात येते.
चौकट
जिल्ह्यात विधानसभा सदस्य १०
विधानपरिषद सदस्य ३
जिल्ह्यात विधानसभेचे १० सदस्य कार्यरत आहेत, तर पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह नुकतेच निवडून आलेले अरुण लाड आणि जयंत आसगावकर असे तीन विधानपरिषदेचे सदस्य आहेत. यातील ११ जणांचा निधी प्राप्त झाला असून, लाड, आसगावकर यांचा निधी अजून प्राप्त झालेला नाही.
कोट
जिल्ह्यातील आमदारांसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्येकी एक कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. शासकीय प्रक्रियेनुसार यातून जिल्ह्यातील विकासकामे राबविण्यात येणार आहेत.
- विजय पवार
जिल्हा नियोजन अधिकारी