अमिताभ बच्चन यांच्याकडून अवनिसाठी ११ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 06:23 PM2020-11-19T18:23:09+5:302020-11-19T18:25:59+5:30
Amitabh Bachchan, kbc, kolhapurnews हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या कर्मवीर या भागात कोल्हापुरातील अनुराधा भोसले यांच्या अवनि संस्थेसाठी तब्बल ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून २५ लाख रुपये त्यांनी जिंकले आहेत.
कोल्हापूर : हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या कर्मवीर या भागात कोल्हापुरातील अनुराधा भोसले यांच्या अवनि संस्थेसाठी तब्बल ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून २५ लाख रुपये त्यांनी जिंकले आहेत.
हिंदी वाहिनीवर अभिनेते अमिताभ बच्चन यांची कौन बनेगा करोडपती ही मालिका प्रसारित होते. या मालिकेच्या ह्यकर्मवीरह्ण या खास भागात अनुराधा भोसले यांचा जीवनसंघर्ष, बालकामगारविरोधी चळवळ, अवनि-एकटी संस्थांद्वारे सुरू असलेले काम, लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची धडपड हा सगळा प्रवास उलगडण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे चित्रीकरण ३० ऑक्टोबरला मुंबई येथील स्टुडिओत झाले आहे. भोसले यांच्यासोबत सेलिब्रेटी म्हणून दिग्दर्शक नागराज मंजुळे आहेत. मंजुळे यांनी प्रश्नांची उत्तरे देत २५ लाख रुपये भोसले यांना जिंकून दिले. चार तासांत दोन तासांचा भाग चित्रित करण्यात आला असून तो शुक्रवारी प्रसारित होत आहे. या मालिकेदरम्यान झालेल्या मुलाखतीद्वारे भोसले यांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी संस्थेला ११ लाखांची मदत केली आहे.
शुक्रवारी होणार प्रक्षेपण
बालहक्क दिनानिमित्त झालेल्या भोसले यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री नऊ ते अकरा या वेळेत हा भाग प्रसारित होत आहे.
या मालिकेच्या चित्रीकरणाचा सगळा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत होता. अमिताभ बच्चन हे अतिशय नम्र आहेत. संस्थेच्या कामाने ते भारावले. यानिमित्ताने कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचले; पण माझा सगळा प्रवास कोल्हापूरकरांच्या मदतीशिवाय झाला नसता; त्यामुळे सर्वांचे आभार मानते.
अनुराधा भोसले,
अवनि संस्था