ट्रस्ट वॉलेटवरून ११ लाखाला गंडा, कोल्हापुरात शाळकरी मुलाच्या गुंतवणुकीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:12 PM2023-01-28T12:12:25+5:302023-01-28T12:12:53+5:30
ट्रस्ट वॉलेट म्हणजे काय..?
कोल्हापूर : बोगस कंपनीच्या ट्रस्ट वाॅलेटवरून गुंतविलेली रक्कम पुन्हा काढून घेताना ११ लाख ११ हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव ट्रेडिंग स्टाॅक्स ॲन्ड क्रिप्टो कंपनी व संशयित आशिष, सुखराम आणि ताकेश्वर यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी हिमजा विजयसिंह देसाई (रा. आर. के. नगर पाचगांव रोड कोल्हापूर) यांनी फिर्याद नोंदविली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देसाई यांचा मुलगा शालेय शिक्षण घेत आहे. पती निवृत्त आहेत. त्यांचा मुलगा मोबाईलवरील टेलिग्रॅम ॲपवर ट्रेडिंग प्राफिट ऑप्शन मार्केट हे चॅनेल पाहत होता. त्याच वेळा मुलास मोबाईल ॲपवरून ‘ॲट जॅकनाऊ ११०’ या आयडीवरून गुंतवणुकीबाबत महादेव ट्रेडिंग स्टाॅक्स ॲन्ड क्रिप्टो या कंपनीचा मेसेज आला. कंपनीने आम्ही भारतीय लायसनधारक आहोत असे सांगितल्यामुळे फिर्यादीच्या मुलाने त्यांच्यावर विश्वास ठेवला.
त्यानंतर मुलाने कंपनीचा ऑपरेटर अशिष, सुखराम, ताकेश्वर यांनी दिलेल्या बँक खात्यावर वेळोवेळी ११ लाख ११ हजार २०० ट्रान्सफर केले. ३१ डिसेंबर २०२२ ते ८ जानेवारी २०२३ या दरम्यान हा व्यवहार झाला. या दरम्यान, ट्रस्ट वाॅलेटवर नफा झाल्याचे दाखविले. त्यामुळे मुलाने ती रक्कम काढावयाची आहे, असे सांगितले. त्यानंतर रक्कम काढण्यासाठी फाॅर्म देऊन तो फाॅर्म भरून दिला. ट्रस्ट वाॅलेट बंद करून रक्कम परत न करता फिर्यादी व मुलाची ११ लाख ११ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. याबाबतची फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. याबाबतचा तपास ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ट्रस्ट वॉलेट म्हणजे काय..?
ट्रस्ट वॉलेट हे विकेंद्रित क्रिप्टो वॉलेट सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला एकाच खात्यातून अनेक क्रिप्टोकरन्सी सुरक्षितपणे स्टोअर आणि व्यापार करण्यास संमती देते. या वॉलेटमध्ये तुम्ही कोणत्याही मध्यस्थाशिवाय क्रिप्टो संचयित, व्यवस्थापित, पाठवू आणि प्राप्त करू शकता. क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन साठवणुकीसाठी ज्याचा उपयोग केला जातो त्यास वॉलेट म्हटले जाते. परंतु, बाजारात यामध्ये जास्त तर फसवणूकच होत असल्याचे आतापर्यंतचे अनुभव आहेत.