कोल्हापूर शहरात कोरोनाचे नवे ११ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:35+5:302021-01-13T04:58:35+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे सुमारे ११ नवे रुग्ण वाढले, तर जिल्ह्यात एकूण नवे १९ रुग्ण ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे सुमारे ११ नवे रुग्ण वाढले, तर जिल्ह्यात एकूण नवे १९ रुग्ण वाढल्याचे सीपीआर प्रशासनाने जाहीर केले. तर १८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला. आता कोरोनाची जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९६४३ वर पोहोचली आहे. डिस्चार्जनंतर सध्या फक्त ३५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात एकही रुग्ण दगावला नाही.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर ओसरला असताना आता शहर पूर्णपणे सावरत आहे. जनजीवन पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाची संख्या ओसरली असली तरीही शहरात तोंडाला मास्क लावूनच नागरिक घराबाहेर पडतात. शहरात विनामास्क वावरल्यास महापालिकेच्या दंडाच्या पावतीला सामोरे जावे लागते, पण ग्रामीण भागात कोरोनाची भीती कमी झाली. ग्रामीण भागात मास्क घालून फिरणारे क्वचितच नागरिक दिसत आहेत. त्यामुळे कोरोना दूर गेल्याची भावना ग्रामीण नागरिकांची बनली आहे. गेल्या चोवीस तासांत १९ पैकी ११ रुग्ण हे फक्त कोल्हापूर शहरात आढळले आहेत. तर इतर ८ रुग्ण हे नगरपालिका हद्दीत सापडले आहेत. तर ग्रामीण भागात एकही रुग्ण मिळालेला नाही.