नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या भूसंपादनात मोठा भ्रष्टाचार, शिवसेनेने केली चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 05:12 PM2023-02-14T17:12:19+5:302023-02-14T17:17:14+5:30
खात्यावर रक्कम जमा केली की ठरावीक टक्केवारी एजंटांना द्यावी लागते
कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरीमहामार्गासाठीच्या भूसंपादनासाठी आलेल्या ११०० कोटींमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, एजंटांमार्फत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. तरी भूसंपादन विभागाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सोमवारी केली.
जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी व विशाळ देवकुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जात असून, त्यांना आर्थिक मोबदला देण्यात येत आहे. मात्र शाहूवाडीसारख्या भागात एजंटांचा सुळसुळाट झाला असून, शेतकऱ्यांना तुमच्या जमीन मोजणीत त्रुटी आहेत, पैसे कोर्टात जमा होणार, दाव्यात अडचणी आहेत, असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत.
खात्यावर रक्कम जमा केली की ठरावीक टक्केवारी एजंटांना द्यावी लागते. आपण असा अनुभव आलेल्या शेतकऱ्यांना बोलावून माहिती घ्यावी तसेच चौकशी समिती नेमून या प्रकरणाची शहानिशा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.