राधानगरी ग्रामपंचायत विधवा प्रथा बंद चळवळीत एक पाऊल पुढे, पुनर्विवाह केल्यास देणार प्रोत्साहन अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 04:09 PM2022-06-06T16:09:30+5:302022-06-06T16:12:48+5:30
राधानगरी ग्रामपंचायतीने फक्त याबाबत निर्णय न घेता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधवा स्त्री पुनर्विवाहासाठी अनुदान देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे.
गौरव सांगावकर
राधानगरी : हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला अन् सर्वत्र यानिर्णयाचे कौतुक होवू लागले. शासनपातळीवर देखील यांची दखल घेण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर करावा याबाबत शासनाने परिपत्रक काढले. अनेक गावांनी याप्रथेला मूठमाती देत विधवा महिलेचा सन्मान केला. असे असतानाच राधानगरी ग्रामपंचायतीने फक्त याबाबत निर्णय न घेता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधवा स्त्री पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीने बोलवलेल्या खास सभेमध्ये विधवा प्रथा बंदीसाठी मांडलेल्या ठरवला सभेने मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी सरपंच कविता शेट्टी होत्या. विषयाचे वाचन ग्रामसेवक एम. आर गुरव यांनी केले. विधवा स्त्रीने पुनर्विवाह केल्यास ग्रामपंचायतीकडून ११,००० प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास सरपंच, सर्व सदस्य यांच्यासह अन्य मान्यवरांनी अनुमोदन दिले.
यावेळी ग्राम विकास अधिकारी एम आर गुरव, उप-सरपंच भाग्यश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य मिथुन पारकर, सचिन पालकर, महेश आडसुळ संजय कांबळे, सरिता बालनकर, अनुराधा तायशेटे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान, गावातील विविध विकास कामाचा आडवा तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.