Kolhapur: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना ११३.६६ कोटीचा दर फरक मिळणार
By राजाराम लोंढे | Published: October 8, 2024 05:58 PM2024-10-08T17:58:35+5:302024-10-08T18:00:18+5:30
गेल्या वर्षीपेक्षा १२.३२ कोटीने वाढ
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघांने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अधिक गोड केली आहे. दूध फरकापोटी तब्बल ११३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ कोटी ३२ लाखांने फरकाची रक्कमेत वाढ झाली आहे. म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये २५ तर गाय दूध उत्पादकांना १ रुपये २५ पैसे फरक मिळणार आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये दि.०१/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ५० पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. यापैकी प्रतिलिटर ०.२५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली.
या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या ७,९२७ दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. संघाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक गावामध्ये म्हैस दूध उत्पादनांत वाढ होणे आवश्यक आहे. यासाठी म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमांतर्गत परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना सुरू असून या योजनेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभागी होऊन जातिवंत म्हैशी खरेदी करून संघाचे म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डोंगळे यांनी केले.