‘बॅंडस्मन’ पदासाठी दिली ११५३ जणांनी लेखी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:11+5:302021-09-04T04:30:11+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस भरतीत बॅण्डस्मनच्या तीन पदासाठीच्या लेखी परीक्षेसाठी ३७१८ जण पात्र ठरले होते. त्यापैकी ११५३ ...
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस भरतीत बॅण्डस्मनच्या तीन पदासाठीच्या लेखी परीक्षेसाठी ३७१८ जण पात्र ठरले होते. त्यापैकी ११५३ उमेदवारांनीच शुक्रवारी लेखी परीक्षा दिली. अन्य २५६५ उमेदवार अनुपस्थित राहिले. पात्र ठरूनही इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा पोलीस दलातील ७८ जागांच्या पोलीस भरतीपैकी बॅंड पथकातील बॅंडस्मन या तीन जागांकरिता शुक्रवारी परीक्षा झाली. ही परीक्षा शाहू काॅलेज, सदर बाजार, न्यू माॅडेल इंग्लिश स्कूल, दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर, विवेकानंद काॅलेज, सायबर काॅलेज, संजय घोडावत विद्यापीठ अशा सहा ठिकाणी घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण ३७१८ जण पात्र ठरले होते. त्यापैकी ११५३ उमेदवारांनीच ही परीक्षा दिली, तर २५६५ जण अनुपस्थित राहिले. पोलीस पदाच्या उर्वरित ७५ रिक्त पदांसाठी एकूण ९५५० उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. त्यापैकी ७३३ उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी पद उपलब्ध नसलेल्या प्रवर्गातून अर्ज केलेले असल्यामुळे त्यांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश पत्र दिली जाणार नाहीत. त्यामुळे उर्वरित ८८१७ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश पत्र दिले जाणार आहे. या उर्वरित ७५ रिक्त जागांकरिता लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.