कोल्हापुरात खासगी रुग्णालयांत ११७२ बेड उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:12+5:302021-04-16T04:23:12+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरिता ११७२ बेड उपलब्ध असून, त्यांमध्ये ९७ व्हेंटिलेटर्स व ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरिता ११७२ बेड उपलब्ध असून, त्यांमध्ये ९७ व्हेंटिलेटर्स व ५३७ ऑक्सिजन बेड आहेत. शहरातील रुग्णालयातील माहिती देण्याकरिता महापालिकेत ‘वॉर रूम’ सुरू झाली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना नेमकी माहिती देण्याचा प्रयत्न या ‘वॉर रूम’मधून होत आहे.
महापालिकेची वॉर रूम दोन दिवसांपासून सुरू झाली असून, तेथून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना योग्य मार्गदर्शन होते का, याची माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने तेथे संपर्क साधला तेव्हा तेथून योग्य माहिती दिली जात असल्याचे दिसून आले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रस्तुत प्रतिनिधीने या वॉर रूमला फोन करून स्वत:च रुग्ण असल्याचे सांगून शहरातील कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती विचारली.
त्यावेळी पलीकडील व्यक्तीने रुग्णाचे नाव, वय, फोन नंबर, राहता कोठे, ऑक्सिजन लेव्हल काय आहे, लक्षणे काय आहेत, केव्हा पॉझिटिव्ह आलात याची माहिती नोंद करून घेतली. विचारपूस केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे रुग्णाला व्हेंटिलेटर किंवा ओटू बेडची आवश्यकता नाही, हे पलीकडील व्यक्तीच्या लक्षात आले. त्यावेळी ‘तुम्ही राहत असलेल्या घराशेजारील कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे याची खात्री करून घेऊन तुम्हाला पाच मिनिटांत परत फोन करतो,’ असे वॉर रूममधून सांगण्यात आले.
वॉर रूममधील व्यक्ती योग्य मार्गदर्शन करीत असल्याची बाब यातून दिसून आली. विशेष म्हणजे जेव्हा फोन करण्यात आला होता, त्यावेळी या वॉर रूमचे नियंत्रण अधिकारी उपायुक्त निखिल मोरे हेसुद्धा तेथे उपस्थित होते. बऱ्याच वेळा अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात; परंतु त्या ठिकाणी योग्य माहिती मिळत नाही, अशी ओरड होते; पण गुरुवारी सायंकाळी मात्र त्याच्या उलटा अनुभव आला. जर पुढील काळात अशीच माहिती मिळत गेली तर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची धावपळ थांबणार आहे; तसेच रुग्णावर तातडीने उपचार होण्यास मदत होणार आहे.
- पॉइंटर्स-
- कोविड रुग्णांवर उपचार करणारी खासगी रुग्णालये - ४७
- या रुग्णालयात उपलब्ध बेडची संख्या - ११७२
- सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या - ५९१
- शिल्लक असलेल्या बेडची संख्या - ५८१
- उपलब्ध व्हेंटिलेटर्सची संख्या - ९७
- व्हेंटिलेटर्सवर उपचारात असलेले रुग्ण - ४८
- शिल्लक असलेल्या व्हेंटिलेटर्सटची संख्या - ४९
- उपलब्ध ऑक्सिजन बेड संख्या - ५३७
- ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण - २७६
- शिल्लक असणारे ऑक्सिजन बेड - २६१
वॉर रूमचे फोन नंबर्स -
०२३१-२५४५४७३ आणि ०२३१-२५४२६०१